जेरुसलेम : गाझामधील सामान्य नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आणि जीवितहानी कमी करण्यासाठी उपाययोजना करावी असे आवाहन अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी शुक्रवारी इस्रायलला केले. मात्र, हमासने ओलिसांची सुटका केल्याशिवाय युद्ध थांबवणार नाही असे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी सांगितले.

हेही वाचा >>> “गाझात दररोज निष्पाप चिमुकल्यांचा बळी जातोय आणि जग…”, दिग्गज माजी भारतीय क्रिकेटपटूची हळहळ

इस्रायलच्या हवाई आणि जमिनीवरील हल्ल्यांमध्ये गाझा पट्टीतील सामान्य पॅलेस्टिनींची प्राणहानी थांबवण्यासाठी अमेरिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. युद्धामध्ये आतापर्यंत किमान ९,२२७ पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला असून त्यामध्ये ३,६०० पेक्षा जास्त लहान मुलांचा समावेश आहे. इस्रायलने तात्पुरत्या युद्धविरामाचे आवाहन यापूर्वीच धुडकावून लावले असले तरी त्यांचा सर्वात मोठा पाठीराखा देश असलेल्या अमेरिकेने गाझामधील जीवितहानी थांबवण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांना सुरुवात केली आहे. त्यासाठी ब्लिंकन शुक्रवारी इस्रायलमध्ये दाखल झाले. दुसरीकडे, इस्रायली फौजांनी गाझामधील आगेकूच सुरू ठेवत, गाझा शहराभोवतीचा फास अधिक आवळला. हमासची जमिनीवरील आणि भुयारी बांधकामे उद्ध्वस्त केली जात असल्याचे इस्रायली लष्कराकडून सांगण्यात आले. हमासचे अनेक अतिरेकी मारले गेल्याचेही सांगितले. त्याचवेळी इस्रायली सैन्याने शुक्रवारीही नागरी वस्त्यांवर हवाई हल्ले केले. त्यामध्ये मोठय़ा प्रमाणात सामान्य नागरिक ठार झाले.