वृत्तसंस्था, डेर अल-बलाह : गाझामध्ये इस्रायली सैन्याने विविध ठिकाणी केलेल्या हल्ल्यांमध्ये किमान ६२ जणांचा मृत्यू झाला अशी माहिती तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिली. इस्रायल आणि हमासदरम्यान पुढील आठवड्यात युद्धविराम होऊ शकते असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितल्यानंतर इस्रायली सैन्याने पॅलेस्टिनींविरोधात आणखी आक्रमक धोरण अवलंबले.

गाझा शहरातील पॅलेस्टाईन स्टेडियमजवळ शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी सकाळपर्यंत करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये १२ जण ठार झाले. तेथे निर्वासितांच्या छावण्या आहेत. आणखी एका हल्ल्यामध्ये आणखी आठजण मृत्युमुखी पडले. हे मृतदेह शिफा रुग्णालयात नेण्यात आले. तर नासेर रुग्णालयात २०पेक्षा जास्त मृतदेह नेल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युद्धविरामाशी संबंधित घडामोडींची माहिती असलेल्या अमेरिकी अधिकाऱ्याने ‘एपी’ला सांगितले की, इस्रायलचे मंत्री रॉन डेर्मर पुढील आठवड्यात वॉशिंग्टनला जाणार आहेत. या भेटीत गाझामधील युद्धविरामासह इतर मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.