Israel Iran War IDF Strikes on Isfahan Nuclear Facility : इस्रायल व इराणमधील संघर्ष वाढला असून शनिवारी रात्री इस्रायली वायूदलाने पुन्हा एकदा इराणच्या इस्फहान आण्विक केंद्रावर हल्ला केला आहे. तत्पूर्वी तेहरानने मध्यरात्री इस्रायलवर बॅलेस्टिक क्षेपणास्रे डागली होती. १३ जून रोजी इस्रायलने इराणमध्ये एअर स्ट्राइक केला होता. तेव्हा देखील इस्रायली वायूदलाने इस्फहान आण्विक केंद्र व इराणी लष्कराच्या तळांवर हल्ले केले होते.
इस्रायली सुरक्षा दलाने (आयडीएफ) दिलेल्या माहितीनुसार इस्रायलच्या वायूदलातील ५० लढाऊ विमानांनी इराणमध्ये घुसून बॉम्बवर्षाव केला. यावेळी इस्फहान आण्विक केंद्र देखील लक्ष्य करण्यात आलं. मात्र, इराणमधील शासकीय वृत्तसंस्था फार्सने म्हटलंय की या हल्ल्यात कुठेही मोठं नुकसान झालेलं नाही. इराणच्या अणू संशोधनात इस्फहान आण्विक केंद्र महत्त्वाची भूमिका बजावतं. येथे यूरेनियम शुद्धीकरण सुविधा आहे.
इराणच्या अणू संशोधन मोहिमेचं मोठं नुकसान
इस्रायली अधिकाऱ्यांनी एएफपीला सांगितलं की “आम्ही आमच्या मोहिमेच्या २४ तास आधी इस्फहानवर हल्ला केला. तर, रात्री मुख्य कारवाई पार पाडली. ज्यामुळे आमच्या या मोहीमेची व्यापकता वाढली आहे”. गेल्या काही दिवसांत इस्रायली लष्कराने इराणमधील अनेक लष्करी व आण्विक तळांवर हल्ले केले आहेत. या वारंवार होत असलेल्या हल्ल्यांमुळे इराणच्या सेंट्रीफ्यूज उत्पादन क्षमतेवर मोठा परिणाम झाला आहे. युरेनियम समृद्ध करण्यासाठी सेंट्रीफ्यूज अत्यंत महत्त्वाचं असतं. जे युरेनियम हेक्झाफ्लोराइड (यूएफ-६) वायू उच्च वेगाने फिरवून युरेनियमचे आयसोटोप वेगळे करतात.
अमेरिकेचे इराणच्या तीन अणू प्रकल्पांवर हवाई हल्ले
दुसऱ्या बाजूला, अमेरिकेनेही इस्रायल-इराण संघर्षात उडी घेतली असून अमेरिकेच्या वायूदलाने इराणमध्ये हवाी हल्ले करून फोर्डो, नतान्झ व इस्फहानमधील तीन अणू प्रकल्पांना लक्ष्य केलं. याबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः माहिती दिली आहे. त्यांनी ट्रूथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की “आम्ही इराणधील फोर्डो, नतान्झ व इस्फहान मधील अणू प्रकल्पांवर यशस्वी हल्ले केले आहेत. एअर स्ट्राइक करून सर्व लढाऊ विमाने इराणच्या हवाई हद्दीबाहेर आली आहेत. यावेळी फोर्डो येथील अणू प्रकल्पाचं सर्वाधिक नुकसान झालं आहे”.