Benjamin Netanyahu On US Israel Iran Updates: इस्रायल-इराणमधील संघर्षात आणखी वाढ झाली आहे. इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांकडून हवाई हल्ले करण्यात येत आहेत. इस्त्रायलने तेहरानला टार्गेट केलं आहे, तर इराणकडूनही इस्रायलमधील काही शहरांवर हवाई हल्ले केले जात आहेत. आता इस्रायल-इराणमधील संघर्षात अमेरिकेची एन्ट्री झाली आहे. इराण-इस्रायलच्या संघर्षात अमेरिकेने सहभागी होत इराणवर मोठे हवाई हल्ले केले आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल माध्यमावर या संदर्भातील माहिती दिली आहे. दरम्यान, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ले केल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. इराणवर हवाई हल्ला करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय इतिहास बदलेल, असं इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

बिन्यामिन नेतान्याहू काय म्हणाले?

अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला केल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी म्हटलं की, “इराणवर हवाई हल्ला करण्याचा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा निर्णय इतिहास बदलेल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मी अनेकदा म्हणतो की शांतता हवी आहे. इतिहासात नोंद होईल की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जगातील सर्वात धोकादायक राजवटीला आणि जगातील सर्वात धोकादायक शस्त्रांना नाकारण्याचं काम केलं. त्यांच्या नेतृत्वाने आज इतिहासाचा एक केंद्रबिंदू निर्माण केला आहे, जो मध्य पूर्व आणि त्यापलीकडे समृद्धी आणि शांतीच्या भविष्याकडे नेण्यास मदत करू शकतो”, असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन बिन्यामिन नेतान्याहू यांनी म्हटलं आहे.

“…तर भविष्यातील हल्ले खूप मोठे असतील”, डोनाल्ड ट्रम्प

इराणवर हवाई हल्ले केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा मोठा इशारा दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की “अमेरिकन सैन्याने जे केलं आहे ते कोणतंही सैन्य करू शकलं नसतं. जर इराणने शांतता प्रस्थापित केली नाही तर भविष्यात त्यांच्यावर होणारे हल्ले खूप मोठे असतील”, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इराणच्या तीन अणु प्रकल्पांवर अमेरिकेचे हवाई हल्ले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं की, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ले करून फोर्डो, नतान्झ आणि इस्फहानमधील तीन अणु प्रकल्पांना लक्ष्य करत यशस्वी हल्ले केले आहेत. आता सर्व विमाने इराणच्या हवाई हद्दीबाहेर आहेत. फोर्डो या प्राथमिक लक्ष्यावर संपूर्ण बॉम्ब पेलोड टाकण्यात आला आहे, असं ट्रम्प यांनी आपल्या ट्रुथ सोशलवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.