सध्याच्याघडीला लस हाच करोना व्हायरसमधून मुक्ती मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे जगातील प्रमुख देशांमध्ये करोना व्हायरसवर लस बनवण्यासाठी मोठया प्रमाणावर संशोधन कार्य सुरु आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यात आघाडीवर असलेला इस्रायलही यामध्ये मागे नाही. द जेरुसलेम पोस्टने हे वृत्त दिले आहे.

लस निर्मितीमध्ये इस्रायल महत्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. “आमच्या प्रयोगशाळेमध्ये करोना विषाणूच्या कुटुंबावर काम सुरु आहे. लस बनवण्याच्या दृष्टीने दोन-तृतीयांश काम पूर्ण झालं आहे” असा दावा जोनाथन गेरशोनी यांनी केला आहे. ते तेल अविव विद्यापीठातील मॉलीक्युलर सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नोलॉजी विभागाचे प्राध्यापक आहेत. ‘करोनावरील लस निर्मितीला आणखी वर्षभराचा कालावधी जाईल’ असे त्यांनी सांगितले.

जोनाथन गेरशोनी मागच्या १५ वर्षांपासून विषाणूंचा अभ्यास करत आहेत. करोना विषाणूमधील रिसेप्टर बाइंडिंग मोतीफ (RBM) या घटकाला लक्ष्य करणारी लस बनवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. RBM हा व्हायरसच्या स्पाइक प्रोटीनमधील छोटासा भाग आहे. पेशींमध्ये घुसखोरी करण्यासाठी व्हायरस वेगवेगळया प्रोटीन्सचा वापर करतो.

‘टार्गेट छोटं असेल आणि लक्ष्य आधीपासून निर्धारित असेल तर लस जास्त परिणामकारक ठरेल’ असे गेरशोनी यांनी सांगितले. “मानवी रोगप्रतिकारक शक्तीपासून RBM लपवून ठेवण्यासाठी व्हायरसकडून पुरेपूर काळजी घेतली जाते. पण व्हायरसच्याच RBM ला लक्ष्य करणारी लस बनवणे हाच युद्ध जिंकण्याचा उत्तम मार्ग आहे” असे गेरशोनी म्हणाले.