ISRO New Chairman : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोचे (ISRO) नवे प्रमुख म्हणून डॉ.व्ही.नारायणन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १४ जानेवारी रोजी डॉ.व्ही.नारायणन हे इस्रोचे विद्यमान प्रमुख डॉ.एस. सोमनाथ यांच्याकडून इस्रोचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. डॉ.व्ही.नारायणन हे सध्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटर (LPSC) चे संचालक आहेत. डॉ.एस. सोमनाथ हे त्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून १४ जानेवारी रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागेवर आता डॉ.व्ही.नारायणन यांच्या नियुक्तीची घोषणा मंगळवारी करण्यात आली आहे.

डॉ.व्ही.नारायणन यांनी भारतीय अंतराळ संस्थेत (इस्रो) विविध महत्त्वाच्या पदांवर काम केलेलं आहे. लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटरच्या संचालक पदाच्या संपूर्ण कार्यकाळात डॉ.व्ही.नारायणन यांच्या मार्गदर्शनाखाली इस्रोच्या विविध मोहिमांसाठी १८३ लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स आणि कंट्रोल पॉवर प्लांट्स वितरित करण्यात आले आहेत. डॉ.व्ही.नारायणन हे इस्रोमधील जेष्ठ शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी जवळपास चार दशके इस्रोत अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलेलं आहे.

हेही वाचा : मतपावत्यांच्या मोजणीत विसंगती नाही! विरोधकांच्या आरोपांचे केंद्रीय निवडणूक आयुक्तांकडून खंडन

तसेच रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट प्रोपल्शन यामध्ये ते तज्ञ आहेत. त्यांनी GSLV Mk III च्या C25 क्रायोजेनिक प्रकल्पाचं प्रकल्प संचालक म्हणून काम केलेलं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली C25 स्टेज यशस्वीपणे विकसित केलं गेलं. या बरोबरच डॉ.व्ही.नारायणन यांनी आदित्य अंतराळयान आणि GSLV Mk-III मिशन्स आणि चांद्रयान-२ आणि चांद्रयान-३ च्या मोहिमेमध्ये देखील त्यांनी महत्वाचं योगदान दिलेलं आहे. भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातील त्यांचं योगदान अतुलनीय असून त्यांचा अनुभव आणि नेतृत्व क्षमता इस्रोला पुढे जाण्यास महत्वाची ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेक पुरस्कारांनी सन्मानित

डॉ.व्ही.नारायणन यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यांना आयआयटी खरगपूरकडून रौप्य तर ॲस्ट्रोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाने (ASI) त्यांना सुवर्णपदक देऊन गौरवलेलं आहे. तसेच एनडीआरएफकडून त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे.