Asaduddin Owaisi Message to Centre Govt: एमआयएम पक्षाचे प्रमुख, खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानविरोधात ठोस कृती करण्याचे आवाहन केंद्र सरकारला केले. त्यांनी पाकव्याप्त काश्मीरचा संदर्भ देत असताना भाजपाच्या घर मे घुस के मारेंगे या विधानाचा हवाला दिला. “भाजपाकडून घर मे घुस के मारेंगे असे नेहमी सांगितले जाते. पण यावेळी या विधानाच्या पलीकडे जाऊन आपल्याला ‘घर मे घुस के बैठ जाना है’ असे म्हणायला हवे”, असे विधान ओवेसी यांनी केले आहे.
तेलंगणा येथे माध्यमांशी बोलत असताना ओवेसी म्हणाले की, भाजपा म्हणतो घर मे घुस के मारेंगे. पण यावेळी केंद्र सरकारने अशी कारवाई करावी की, घरात घुसून बसावे. भारताच्या संसदेनेही ठराव करून पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग असल्याचे म्हटले होते. मग ते आपलेच घर असेल तर ताब्यात घेतले पाहिजे, असे सूचक विधान त्यांनी केले.
दहशतवादाचा कायमचा बिमोड करण्याची आता वेळ आली आहे, असेही ओवेसी म्हणाले. यासाठी त्यांनी यापूर्वी झालेल्या काही घटनांचा दाखला दिला. “मुंबईवरील हल्ले, पुलवामा, उरी, पठाणकोट, रियासी असे अनेक हल्ले यापूर्वी झाले आहेत. यावेळी तर संपूर्ण विरोधी पक्षाने एकमताने केंद्र सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे केंद्राने दहशतवाद संपुष्टात आणावा”, असेही ओवेसी म्हणाले.
असदुद्दीन ओवेसी यांनी पुढे म्हटले की, पाकिस्तान अनेकदा आमच्याडे अणुबॉम्ब आहे, असे सांगतो. पण तुम्ही जर देशात घुसून निष्पाप लोकांना मारणार असाल तर देश शांत बसणार नाही. तुम्ही देशात घुसून आमच्याच माणसांना धर्माच्या आधारावर मारणार असाल तर तुम्हाला धर्माबाबत बोलण्याचा अधिकार नाही. तुम्ही इसिससारखे वागले आहात.
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरणमध्ये २२ एप्रिल रोजी भीषण दहशतवादी हल्ला करण्यात आला. ज्यामध्ये २५ पर्यटक आणि एक स्थानिकाचा मृत्यू झाला. अलीकडच्या काळातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. देशभरातून सहलीसाठी आलेल्या पर्यटकांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले.