केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या पदवीचा वाद पुन्हा एकदा न्यायालयात गेला आहे. इराणी यांच्या कथित बोगस पदव्यांवरून मागील काही काळापासून वाद सुरु आहे. याविषयी दिल्ली उच्च न्यायालयाने आज त्यांना आपली सर्व कागदपत्रे सादर कऱण्याचे आदेश दिले आहेत.

इराणी यांना त्रास देण्यासाठी हा खटला दाखल केल्याचे मत नोंदवत दिल्लीतील कनिष्ठ न्यायालयाने गेल्यावर्षी हा खटला रद्द केला होता. अहमद खान या व्यक्तीने हा खटला दाखल केला होता. कनिष्ठ न्यायालयाने हे प्रकरण बाद केल्यानंतर खान यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

इराणी यांनी २००४ मधील निवडणुकीत लढताना आपण दिल्ली विद्यापीठातून बीए केले असल्याचे सांगितले होते. नंतर आपली शैक्षणिक पात्रता बी.कॉम पार्ट १ असल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र त्यांच्या पदवीची कागदपत्रे सापडत नसल्याचे निवडणूक आयोग आणि दिल्ली विद्यापीठाने याआधीच सांगितले होते.

[jwplayer hxATNALn]

स्मृती इराणी यांनी २००४, २०११ आणि २०१४ मध्ये निवडणूक लढविण्याआधी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या शैक्षणिक पात्रतेसंबंधी चुकीची माहिती दिली, असा आरोप खान यांनी केला होता. शिक्षणमंत्री असताना त्यांच्या पदवीविषयी झालेल्या वादाने त्यांच्यावर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीकाही झाली होती. याशिवाय कागदपत्रांमध्ये बॅचलर ऑफ कॉमर्स असल्याचे म्हटले आहे. मात्र त्यांनी ही पदवी घेतली नसल्याचे खान यांनी आपल्या खटल्यात म्हटले होते.