भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे नेते हे शहीद जवानांच्या नावावर मते मागत आहेत. देशातील जवान शहीद झाले असताना त्यांच्या बलिदानावर मतदान मागतांना तुम्हाला लाज कशी वाटत नाही असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विचारला आहे .

परभणी लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारासाठी मुंडे यांनी आज जिंतूर व मंठा तालुक्यातील विरेगाव येथे जाहीर सभा घेतल्या त्यावेळी ते बोलत होते. जवानांच्या कर्तृत्वाचे, बलिदानाचे राजकीय भांडवल करणारा पंतप्रधान याआधी आपण कधी पाहिला नाही. तुमच्या ५६ इंच छातीत दम असेल तर या नवमतदारांना आम्ही तुम्हाला रोजगार देतो असा शब्द देऊन मत मागा. ते शक्य नाही; पण म्हणून शहीद जवानांच्या बलिदानाचा असा वापर करू नका असे त्यांनी सांगितले.

नरेंद्र मोदी यांनी आजच्या नगरच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रवादावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या नसानसात राष्ट्रवाद आहे असे ते म्हणाले. त्यासाठी तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही; आम्हाला नावे ठेवण्यापेक्षा भाजपाची मोदी पार्टी झाली आहे त्याचे काय ते बघा असे मुंडे म्हणाले.

परभणीच्या शिवसेनेच्या खासदाराच्या कृपेने आज किती गुंडाराज माजला आहे, इथला खासदार वाळू माफिया आहे, जमीन माफिया आहे यांना खासदार नाहीतर नासदार म्हणणे योग्य होईल, अशी टीका मुंडे यांनी केली.

“राष्ट्रवादीने राजेश विटेकर सारख्या तरुण तडफदार युवकाला उमेदवारी दिली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात जास्तीत जास्त उमेदवार राष्ट्रवादीने तरुण दिले आहेत. या नव्या विचारांच्या उमेदवारांना लोकसभेत आवाज म्हणून पाठवा,” असे आवाहन त्यांनी केले.