जम्मू-काश्मीरच्या बनीहालमध्ये ३० मार्च रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर पुलवामा सारखा हल्ला करण्याचा प्रयत्न फसला होता. हल्ल्याच्या या अयशस्वी प्रयत्नामागे हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे एनआयएच्या तपासातून समोर आले आहे. ३० मार्च रोजी बनीहालमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर कार बॉम्बने हल्ल्याचा प्रयत्न झाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जैश-ए-मोहम्मदला पाहून हिजबुलने असा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तपासाशी संबंधित असलेल्या दोन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे. १४ फेब्रुवारी रोजी पुलवामामध्ये स्फोटकांनी भरलेले वाहन सीआरपीएफ जवानांच्या बसवर धडकवण्यात आले. यात भारताचे ४० पेक्षा जास्त जवान शहीद झाले. जैशने या हल्ल्याचा कट रचला होता.

पुलवामा सारख्या हल्ल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवण्याचा हिजबुलचा प्रयत्न होता. हिलाल अहमद मंतू, ओवेस अमीन, उमर शरीफ, अकीब शाह, शाहीद वानी आणि वसीम अहमद दार या दहशतवाद्यांच्या चौकशीतून एनआयएला या कटाची माहिती मिळाली. जैशने पुलवामामध्ये केले तसे काहीतरी मोठे करण्याची गरज आहे. त्यामुळे अशा प्रकारचा हल्ला करण्याचे हिजबुलच्या वरिष्ठ नेत्यांकडून आदेश देण्यात आले होते.

जिलेटीनच्या काडया, युरीया, अमोनिअम नायट्रेट, एलपीजी सिलिंडर आणि अन्य रसायनांचा वापर करुन त्यांनी बॉम्ब बनवला होता. हा हल्ला यशस्वी झाला असता तर पाकिस्तान रहाणारा हिजुबलचा नेता सय्यद सलाहउद्दीनचे त्या देशात कौतुक झाले असते असे या दहशतवाद्यांनी सांगितले. पुलवामा हल्ल्यानंतर दीड महिन्याने अशा हल्ल्याचा प्रयत्न झाला. सीआरपीएफचा ताफा श्रीनगरहून जम्मूच्या दिशेने निघालेला असताना सकाळी १० च्या सुमारास स्फोटकांनी भरलेली सेंट्रो कार सीआरपीएफच्या बसला धडकवण्याचा प्रयत्न झाला. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jaish hizbul mujahideen tried attack on crpf convoy in kashmir
First published on: 30-05-2019 at 11:53 IST