पीटीआय, श्रीनगर
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सोमवारी शहराच्या जुन्या भागात असलेल्या नक्षबंद साहिब कब्रस्तानाच्या दरवाजावरून चढून जात १९३१मध्ये डोगरा जवानांनी मारलेल्या २२ नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. नॅशनल कॉन्फरन्स आणि विरोधी पक्षाच्या काही नेत्यांना १३ जुलै रोजी शहीद दिनी कब्रस्तानात जाण्यापासून रोखण्यासाठी नजरकैदेत ठेवण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी, सोमवारी ही नाट्यमय घडामोड घडली.
श्रीनगरच्या मध्यभागी असलेल्या खानयार आणि नौहट्टा या दोन्ही बाजूंनी शहीद स्मारकाकडे जाणारे रस्ते सुरक्षा दलांनी बंद केले होते, परंतु नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला खानयार क्रॉसिंग येथून ऑटोरिक्षाद्वारे तर शिक्षणमंत्री सकिना इट्टू दुचाकीवर बसून शहीद स्मारकापर्यंत पोहोचले. ओमर अब्दुल्ला यांचा ताफा शहरातील खानयार येथे पोहोचताच, ते गाडीतून उतरले आणि एक किलोमीटरहून अधिक चालत कब्रस्तान गाठले, परंतु अधिकाऱ्यांनी या ठिकाणचे दरवाजे बंद केलेले आढळले. यानंतर मुख्यमंत्री अब्दुल्ला यांनी मुख्य प्रवेशद्वाराच्या दरवाजावरून चढून जात ‘फातहा’ पढण्यासाठी कब्रस्तान गाठले.
कब्रस्तानात प्रवेश करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि पोलिसांवर टीका केली.
मिरवैज उमर फारुख यांची खोचक टीका
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी हुकूमशाहीचा कटू अनुभव घेतल्यानंतर येथील नागरिकांचा सन्मान आणि मूलभूत अधिकार राखण्यावर आपले लक्ष केंद्रित करावे, असे खोचक आवाहन हुर्रयित कॉन्फरन्सचे अध्यक्ष मिरवैज उमर फारूख यांनी सोमवारी केले.
कायदा आणि सुरक्षा ही आपली जबाबदारी आहे, असे म्हणणाऱ्या लोकांच्या सूचनेनुसार आम्हाला येथे ‘फातहा’ची परवानगी नाकारण्यात आली, हे अतिशय दु:खद आहे. आम्हाला (रविवारी) घरातच नजरकैदेत ठेवण्यात आले. त्यांनी आजही आम्हाला थांबवण्याचा, आम्हाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. पोलीस कधीकधी कायदा विसरतात.– ओमर अब्दुल्ला, मुख्यमंत्री, जम्मू-काश्मीर