अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या या महिन्याअखेरच्या भारत-भेटीच्या पाश्र्वभूमीवर पाकिस्तानातील दहशतवादी संघटना भारतात हल्ले करू शकतात, असा इशारा मिळाल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरू असतानाच दहशतवादी संघटनांचे इरादे हाणून पाडण्याकरिता संपूर्ण जम्मू भागातील सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात कुठलीही अप्रिय घटना घडू नये या उद्देशाने पोलिसांची तातडीने मदत देणारी पथके आणि पोलीस नियंत्रण कक्षाची वाहने ‘हाय अॅलर्ट’वर ठेवण्यात आली असून, दर ८ ते १० किलोमीटर अंतरावर नवे तपासणी नाके स्थापन करण्यात आले आहेत, असे जम्मू कथुआ परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक शकील अहमद बेग यांनी सांगितले. जम्मूतील प्रत्येक ‘एन्ट्री’ तसेच ‘एक्झिट’ पॉइंटवर जादा खबरदारी घेण्यात येत असून या भागात येणाऱ्या व येथून बाहेर जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येत आहे, असे ते म्हणाले.
ओबामांच्या भारत-भेटीपूर्वी भारतीय भूमीवर दहशतवादी हल्ले घडवून आणण्याकरिता भारतात प्रवेश करण्यासाठी पीर पंजाल पर्वतरांगांच्या पाकिस्तानकडील बाजूला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलीकडे (एलओसी) शस्त्रांनी सज्ज असे २०० अतिरेकी प्रतीक्षेत आहेत, असे लष्कराने आज सांगितले. शाळा, धार्मिक स्थळे, लष्कराची वाहने आणि नागरी वसाहती यांसारख्या ‘सॉफ्ट टार्गेट्स’ना दहशतवादी लक्ष्य बनवू शकतात, अशी साधारणपणे माहिती मिळाली आहे. सीमेपलीकडून भारतात शिरू पाहणाऱ्यांचे प्रयत्न आम्ही आतापर्यंत तरी हाणून पाडले आहेत, असे १६ कॉर्प्सचे कमांड अधिकारी लेफ्टनंट जनरल के. एच. सिंग यांनी सांगितले. अशा प्रकारच्या कुठल्याही आकस्मिक प्रसंगाला तोंड देण्यास लष्कर पूर्णपणे सज्ज असून, दहशतवादी संघटनांचे इरादे हाणून पाडण्याकरिता सुरक्षा संस्थांनी दक्षतेमध्ये वाढ केली असल्याचे ते म्हणाले.
पाकिस्तानकडून सीमेवरील गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याने सीमा सुरक्षा दलानेही (बीएसएफ) आंतरराष्ट्रीय सीमेवरील पहारा वाढवला आहे. सीमेपलीकडून सुरू असलेल्या गोळीबाराचा फायदा घेऊन अतिरेकी भारतात उपद्रव घडवून आणण्यासाठी इकडे येण्याचा प्रयत्न करतात; परंतु गोळीबाराच्या घटना वाढूनही त्यांचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत याची आम्ही काळजी घेतली आहे, असे बीएसएफच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. प्रजासत्ताक दिनापूर्वी घुसखोरीचे प्रयत्न वाढतील, अशी विशिष्ट माहिती मिळाल्यामुळे जादा खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती त्याने दिली.
संग्रहित लेख, दिनांक 16th Jan 2015 रोजी प्रकाशित
जम्मू-काश्मिरात अतिदक्षतेचा इशारा
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या या महिन्याअखेरच्या भारत-भेटीच्या पाश्र्वभूमीवर पाकिस्तानातील दहशतवादी संघटना भारतात हल्ले करू शकतात, असा इशारा मिळाल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
First published on: 16-01-2015 at 03:08 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jammu put on high alert after terrorist attack inputs