वर्षपूर्तीनिमित्त शक्तिप्रदर्शन

भारतीय जनता पक्षाने केंद्र सरकारच्या वर्षपूर्तीला शक्तिप्रदर्शनाच्या उत्सवाचे स्वरूप दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या सभा व देशभर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतीय जनता पक्षाने केंद्र सरकारच्या वर्षपूर्तीला शक्तिप्रदर्शनाच्या उत्सवाचे स्वरूप दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या सभा व देशभर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रात सत्तास्थापनेच्या वर्षभरात पहिल्यांदाच इतक्या मोठय़ा प्रमाणावर विकासकामे झाल्याचा प्रचार भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय मंत्री, आमदार-खासदार देशभरात २०० मोठय़ा सभांमधून करतील.  दि. २५ मेपासून सुरू होणारे हे शक्तिप्रदर्शन १ जूनपर्यंत चालेल. याशिवाय सुमारे पाच हजार ठिकाणी जनसभांचे आयोजन करण्यात आले आहे.
‘जनकल्याण पर्व’ या नावाने वर्षपूर्तीचा आनंदसोहळा साजरा केला जाणार आहे. यासंबंधी केंद्रीय मंत्री अनंतकुमार म्हणाले की, पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे जन्मगाव असलेल्या मथुरेत नरेंद्र मोदी यांची २५ मे रोजी सभा होणार आहे. कर्नालमध्ये व दि. २७ रोजी सुरतमध्ये अमित शहा यांची सभा होणार आहे. आटोक्यात आलेली महागाई, भ्रष्टाचाराचे उच्चाटन आदी मुद्दय़ांवर भर देण्याची सूचना अमित शहा यांनी  केली आहे. शपथविधी सोहळ्याच्या वर्षपूर्तीच्या दिवशी (दि. २६ मे) नरेंद्र मोदी  ‘किसान चॅनल’चे लोकार्पण करतील.

‘जमीन अधिग्रहणावरून’ पक्षाची जनजागृती
जमीन अधिग्रहण विधेयकामुळे केंद्रास शेतकरीविरोधी ठरविणाऱ्यांना कोणतेही प्रत्युत्तर देऊ नका. त्याऐवजी विकासाची कामे, संपुआच्या काळातील भ्रष्टाचाराचे संदर्भ सभा-कार्यक्रमांमधून देण्याची रणनीती भाजपने आखली आहे. २०० शहरांमध्ये पत्रकार परिषदा, तर पाचशे ठिकाणी मोदी सरकारच्या कामकाजाची माहिती सांगणारी प्रदर्शनी भरवण्यात येईल. प्रत्येक केंद्रीय मंत्र्यास तीन दिवस प्रत्येकी एक सभा व एक पत्रकार परिषद घेण्याचे आदेश नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी दिले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Jankalyan parva will be celebrated on complition of 1 yr of govt

ताज्या बातम्या