Japan On Donald Trump : गेल्या काही दिवसांपासून इराण-इस्रायलमध्ये सुरु असलेला संघर्ष आता निवळला आहे. अमेरिकेने मध्यस्थी करत या दोन्ही देशातील युद्धसमाप्तीची घोषणा केली. मात्र, त्याआधी इराण-इस्रायल संघर्षात अमेरिकेनेही उडी घेत इराणमधील ३ आण्विक तळांवर मोठा हल्ला केला होता. या हल्ल्यात इराणमधील ३ आण्विक तळ नष्ट केल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. या हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी इराण-इस्रायलमध्ये युद्धसमाप्तीची घोषणा केली. पण या हल्ल्याबाबत सांगताना ट्रम्प यांनी इराणवरील हल्ले हिरोशिमा-नागासाकीसारखे होते असं विधान केलं होतं.
आता ट्रम्प यांच्या या विधानावरूनच जपानने संताप व्यक्त केला आहे. तसेच ट्रम्प यांनी इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यांची तुलना हिरोशिमा आणि नागासाकीच्या अणुबॉम्ब हल्ल्याशी केल्यानंतर जपानने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. नागासाकीच्या महापौरांसह स्थानिक नेत्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नागासाकीचे महापौर शिरो सुझुकी यांनी ट्रम्प यांच्या टिप्पणीला उत्तर देताना म्हटलं की, “जर ट्रम्प यांच्या टिप्पण्या अणुबॉम्ब टाकण्याचं समर्थन करत असतील तर ज्या शहरावर बॉम्ब टाकण्यात आले होते त्या शहरासाठी हे अत्यंत खेदजनक आहे”, असं त्यांनी म्हटलं. या संदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाच्या हवाल्याने टाइम्स नाऊने दिलं आहे.
दरम्यान, हिरोशिमामधील नागरिकांनी ट्रम्प यांनी त्यांचं विधान मागे घ्यावं अशी मागणी करत गुरुवारी निदर्शने केली आहेत. तसेच याबाबत जपान औपचारिकपणे तक्रार दाखल करेल का? असं विचारलं असता मुख्य कॅबिनेट सचिव हयाशी योशिमासा यांनी सांगितलं की, “जपानने वॉशिंग्टनला अणुबॉम्बबाबत आपली भूमिका वारंवार व्यक्त केलेली आहे.”
डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणाले होते?
इराण-इस्रायल संघर्षात अमेरिकेने उडी घेत इराणमधील फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या ३ आण्विक तळांवर हल्ला केला होता. या हल्ल्याचा संदर्भ देत ट्रम्प यांनी म्हटलं होतं की,’इराणवरील हे हल्ले हिरोशिमा आणि नागासाकीवरील अणुबॉम्बसारखे होते. ज्याने इस्रायल आणि इराणमधील १२ दिवसांचा संघर्ष समाप्त केला’, असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं. तसेच आपण हिरोशिमाचे उदाहरण देऊ इच्छित नसल्याचंही यावेळी ट्रम्प यांनी स्पष्टीकरण दिलं होतं.
अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यात नष्ट झालेले ३ अणुकेंद्र कोणते?
अमेरिकेने इराणवर हवाई हल्ले केल्यानंतर अमेरिकन आणि इस्रायली अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या कारवाईत अमेरिकन स्टेल्थ बॉम्बर्स आणि जीबीयू-५७ बंकर बस्टर बॉम्ब वापरण्यात आले. जे मजबूत भूमिगत टार्गेट करण्यास सक्षम आहेत. अमेरिकेने इराणच्या ३ अणुकेंद्रावर केलेल्या हल्ल्यात फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान हे तीनही आण्विक तळ नष्ट झाल्याचं अमेरिकेने म्हटलं होतं.