लागोपाठ पाचव्या दिवशी वादग्रस्त पूर्व चीन सागरी बेटांच्या प्रदेशात चिनी जहाजांनी घुसखोरी केल्याचे दिसून आल्यानंतर जपानने चीनच्या राजदूतांना बोलावून समज दिली.
परराष्ट्र मंत्री फुमियो किशिदा यांनी टोकियोत चीनचे राजदूत चेंग योंगहुआ यांना परराष्ट्र कार्यालयात बोलावले होते. लागोपाठ दुसऱ्यांदा त्यांना समज देण्यात आली. याआधी शुक्रवारीही त्यांना बोलावण्यात आले होते. परराष्ट्र मंत्र्यांनी चेंग यांना सांगितले की, जपान व चीन यांच्यातील संबंध घसरत चालले आहेत. चीन तणाव वाढवणारी कृत्ये एकतर्फी करीत आहे.
जपान व चीन यांच्यात जपानमधील सेनकाकू व चीनमधील डिओयू या वसाहत नसलेल्या बंदरांवरून पूर्वीचाच वाद आहे. जपानच्या परराष्ट्र मंत्रालय अधिकाऱ्यांनी शुक्रवारपासून चीनला धारेवर धरले असून चीनच्या जहाजांनी घुसखोरी केल्याचा आरोप केला आहे. चेंग यांना शुक्रवारी परराष्ट्र उपमंत्री शिन्शुके सुगीयामा यांनी बोलावून घेतले होते, कारण त्या वेळी चीनच्या दोन तटरक्षक जहाजांनी जपानी हद्दीत प्रवेश केला होता. मंगळवारी सकाळी जपानच्या तटरक्षक दलाला चीनची दोन जहाजे त्यांच्या सागरी हद्दीत येताना दिसली. जपानच्या तटरक्षक जलाने १५ जहाजांनी घुसखोरी केल्याचा आरोप केला असून चीनच्या २३० मच्छिमारी बोटी व सात तटरक्षक जहाजे जपानच्या हद्दीत आली होती, त्यातील चार जहाजात शस्त्रे होती. चीनच्या जहाजांनी जपानी सागरी हद्दीत अशी घुसखोरी करण्याचे दुर्मीळ मानले जाते. जपानच्या क्योडो या वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, जपानला चीनबरोबर उच्चस्तरीय बोलणी हवी आहेत.कारण जपानने वारंवार निषेध करूनही घुसखोरी थांबलेली नाही. जपानने जून महिन्यातही चीनची नौदल युद्धनौका त्यांच्या बेटांजवळ आल्याने निषेध व्यक्त केला होता.