रविवारी भारताविरोधात होणाऱ्या महत्वाच्या सामन्यापूर्वी यजमान इंग्लंडसाठी आनंदाची बातमी आहे. इंग्लंडचा सलामी फलंदाज जेसन रॉय दुखापतीतून सावरला आहे. मांडीचे स्नायू दुखावल्यामुळे तीन सामन्यांना जेसन रॉयला मुकावे लागले होते. मात्र, आता तो पूर्णपणे तंदुरूस्त असून उद्या भारताविरोधातील सामन्यात खेळण्याची शक्याता आहे.
जेसन रॉय नेटमध्ये सराव करताना दिसला असून याचा व्हिडीओ आयसीसीने पोस्ट केला आहे. जेसन रॉयच्या पुनरागमनामुळे इंग्लंडची सलामीची समस्या सुटणार आहे. रॉयने चार सामन्यांमध्ये ७१.६६च्या सरासरीने २१५ धावा केल्या आहेत. त्याच्या जागी संधी मिळालेल्या जेम्स विन्सला (२६, १४, ०) तिन्ही सामन्यांमध्ये चमक दाखवता आली नाही.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त झाल्यामुळे जेसन रॉयला अफगाणिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यांना मुकावे लागले होते. त्याच्या अनुपस्थितीत इंग्लंडला श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. आता उपांत्य फेरीत मजल मारण्यासाठी इंग्लंडला भारत आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यांपैकी एका सामन्यात विजय मिळवणे अनिवार्य आहे.
विजेतेपदाचे दावेदार म्हणून स्पर्धेत उतरलेल्या यजमानांना श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवामुळे उपांत्य फेरीत आव्हान खडतर झाले आहे. दोन भारत आणि न्यूझीलंडबरोबर विजय मिळवणे आता यजमानांना आवश्यक झाले आहे. जेसन रॉय पूर्णपणे तंदुरूस्त झाला आहे. शनिवारी नेटमध्ये सराव पाहून तो भारताविरोधात खेळेल का ? याचा निर्णय घेणार असल्याचे इंग्लंड क्रिकेटने स्पष्ट केले आहे.
इतिहासावर नजर टाकल्यास गेल्या २७ वर्षांमध्ये विश्वचषकात इंग्लंड संघाला भारत आणि न्यूझीलंड संघाचा पराभव करता आला नाही. त्यातच उपांत्य फेरीत जागा निश्चित करण्यासाठी इंग्लंड संघाला अंतिम दोन्ही सामने जिंकणे अनिवार्य आहेत. यजमान इंग्लंड संघ सात सामन्यात चार विजयासह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. बांग्लादेश, पाकिस्तान यांनाही उपांत्य फेरीत पोहचण्याची संधी आहे.