प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी ट्विटवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. देशाची अर्थव्यवस्था रुळांवर आणण्यासाठी २० लाख कोटींची आर्थिक मदतीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली. आर्थिक सुधारणा वेगाने लागू करण्यात येतील असं आश्वासनही पंतप्रधानांनी देशाच्या जनतेला दिलं. मात्र या ३३ मिनिटांच्या भाषणामध्ये पंतप्रधानांनी देशातील स्थलांतरित मजुरांच्या समस्येसंदर्भात एक शब्दही उच्चारला नाही असा टोला अख्तर यांनी लगावला आहे. मात्र मोदींवर केलेल्या टीकेमुळे आता त्यांना अनेकांनी लक्ष्य केल्याचे चित्र ट्विटवर दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान मोदींनी मंगळवारी देशाला संबोधित करताना देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आर्थिक मदतीची घोषणा केली. मात्र त्याचबरोबर त्यांनी लॉकडाउन चारमध्ये नियम पहिल्या तीन लॉकडाउनपेक्षा वेगळे असतील असंही स्पष्ट केलं. मोदींनी आपल्या ३३ मिनिटांच्या भाषणामध्ये आर्थिक दृष्ट्या भारताने आत्मनिर्भर होण्याची गरज असल्याचे मत मांडले. मोदींच्या या भाषणाबद्दल अख्तर यांनी ट्विटवरुन टीका केली आहे. “२० लाख कोटींच्या आर्थिक मदतीमुळे देशाचे मनोधैर्य नक्कीच वाढले. मात्र ३३ मिनिटांच्या या भाषणामध्ये ज्या लाखो प्रवासी मजुरांना त्यांचे अस्तित्व टीकवण्यासाठी तात्काळ मदतीची गरज आहे त्या मजुरांना होत असणाऱ्या त्रासाबद्दल एक शब्दही नव्हता. हे चुकीचे आहे,” असं अख्तर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अख्तर यांच्या या ट्विटरुन काही जणांनी त्यांना उलट प्रश्न केले असून त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेकांनी मोदींचे समर्थन केले असून अख्तर यांच्यावर टीका केल्याचे त्यांच्या ट्विटला दिलेल्या प्रतिक्रियांमधून दिसून येत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Javed akhtar slams modi speech says in a speech of 33 minutes not even a word about migrant workers scsg
First published on: 13-05-2020 at 14:04 IST