Shyam Rajak remark on Who will Become Chief Minister of Bihar : बिहारच्या विधानसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. एनडीएने २०३ जागा जिंकल्या आहेत. दुसरीकडे महाआघाडीची कामगिरी मात्र सुमार राहिली आहे. काँग्रेसला सहा व राष्ट्रीय जनता दलाला २५ जागा जिंकता आल्या आहेत. एनडीएमध्ये आणि एकंदरित बिहारमध्ये भारतीय जनता पार्टी सर्वात मोठी पार्टी ठरली आहे. भाजपाने ८९ तर, जनता दलाने (संयुक्त) ८५ जागा जिंकल्या आहेत. लोक जनशक्ती पार्टीचे १९ उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रीय लोक मोर्चाला देखील चार जागांवर विजय मिळाला आहे.

दरम्यान, भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्यामुळे आता बिहारचं मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. एनडीए पुन्हा एकदा नितीश कुमार यांना संधी देणार की भाजपा स्वतःच्या एखाद्या नेत्याला मुख्यमंत्रिपदी बसवणार याबाबत वेगवेगळी चर्चा चालू आहे. दरम्यान, नितीश कुमार यांचे निकटवर्तीय व जनता दलाचे वरिष्ठ नेते श्याम रजक म्हणाले, “बिहारमध्ये मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा नितीश कुमार हेच शपथ घेतील.”

श्याम रजक काय म्हणाले?

रजक यांनी पाटणा येथे काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “मुख्यमंत्रिपदासाठी नितीश कुमार यांच्याऐवजी दुसरं कोणीच नाही. आम्ही दुसऱ्या कोणाचा विचारच केलेला नाही. मुख्यमंत्रिपदाबाबत आमचं आधीच ठरलं आहे. पुन्हा एकदा नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील.”

भाजपाची भूमिका काय?

भाजपा नेते धर्मेंद्र प्रधान यांनी निवडणुकीच्या निकालानंतर दी इंडियन एक्सप्रेसशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “एनडीए अतूट आहे. तसेच नितीश कुमार हेच एनडीए आघाडीचे नेते आहेत.” दरम्यान, एनडीए अखंड आहे तर मग नितीश कुमार मुख्यमंत्री होणार का? असा प्रश्न प्रधान यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “सरकार एनडीएचंच बनणार आहे आणि नितीश कुमार हे एनडीएचे सर्वात मोठे नेते असतील.”

भाजपाकडे मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार नाही?

भाजपाकडे मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार असायला हवा होता का? असा प्रश्न यावेळी धर्मेंद्र प्रधान यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, गोंधळ निर्माण करू नका. हा एनडीएचा स्पष्ट विजय आहे. मोदींनीही हा विजय एनडीएचा असल्याचं म्हटलं आहे. या विजयामुळे बिहारच्या विकासाला चालना मिळेल.