Jhansi Hospital Fire News Update : उत्तर प्रदेशच्या झाशीमध्ये शुक्रवारी रात्री घडलेल्या भयंकर दुर्घटनेमध्ये १० नवजात अर्भकांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याचा दुर्दैवी प्रकार समोर आला आहे. झाशीमधील महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजच्या शासकीय रुग्णालयात ही आग लागली. नवजात अर्भकांच्या अतिदक्षता विभागात शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज असून सविस्तर तपास करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. दरम्यान, आग लागली तेव्हा एक प्रत्यक्षदर्शी तिथे उपस्थित होता. त्याने परिचारिकेच्या निष्काळजीपणावर ठपका ठेवला आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

हमीरपूरचे रहिवासी भगवान दास घटनेच्या वेळी वॉर्डमध्ये उपस्थित होते. त्यांच्या मुलावर येथे उपचार सुरू होते. दास यांनी दावा केला की, “ऑक्सिजन सिलिंडरचा पाईप जोडला जात असताना एका नर्सने माचिसची काडी पेटवली. त्यामुळे येथे आग लागली. ऑक्सिजन अत्यंत ज्वलनशील आहे आणि त्यामुळे संपूर्ण वॉर्डभर आगीचे लोण पसरले.”

हेही वाचा >> Jhansi Fire: झाशीमध्ये हाहाकार! रुग्णालयाच्या आगीत १० नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू, योगी आदित्यनाथांकडून शोक व्यक्त

“माचिस पेटताच संपूर्ण वॉर्ड पेटला”, दास यांनी सांगितले. यादरम्यान, दास यांनी पटकन ३-४ मुलांना त्यांच्या गळ्यातील कापडाने गुंडाळले आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी नेले. त्यांनी इतर लोकांच्या मदतीने आणखी काही मुलांना वाचवले. शुक्रवारी रात्री १०.३० च्या सुमारास वॉर्डात लागलेल्या आगीमुळे रुग्णालयात चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. वॉर्डात कालबाह्य झालेले अग्निशामक यंत्र होते, तर सुरक्षा अलार्म देखील वाजला नाही. यामुळे मुलांना बाहेर काढण्यास विलंब झाला.

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक म्हणाले, प्रथमदर्शनी, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आगीचे कारण तपासले जाईल. काही त्रुटी आढळल्यास, जे जबाबदार असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि कोणालाही सोडले जाणार नाही.”

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची पोस्ट

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर शोक व्यक्त करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. “ही दुर्दैवी घटना काळीज पिळवटून टाकणारी आणि प्रचंड वेदना देणारी आहे. यासंदर्भात युद्धपातळीवर बचावकार्य राबवण्याचे आदेश संबंधित प्रशासनाला देण्यात आले आहेत”, असं आदित्यनाथ यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नुकसान भरपाई जाहीर

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांनी मृत मुलांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घटना हृदयद्रावक असल्याचे सांगून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची अतिरिक्त मदत दिली जाईल असे सांगितले.