Jharkhand Chief Minister won Majority Test : झारखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालट झाली आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची आमदारकी धोक्यात आली होती. या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सोरेन यांनी आज विधानसभेचे विषेश अधिवेशन बोलावले होते. अधिवेशनादरम्यान मांडण्यात आलेला विश्वासदर्शक ठराव हेमंत सोरेन यांनी जिंकला आहे. सभागृहात पहिल्यांदा आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यात आला. सरकारच्या बाजूने ४८ मते पडली तर विरोधात एकही मत पडले नाही. विरोधी पक्ष भाजपाने मतदानावर बहिष्कार टाकला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- “२०१७ साली एनडीएसोबत जाण्याचा निर्णय मुर्ख…”; नितीश कुमारांचा भाजपावर हल्लाबोल

आमदारांना ३० ऑगस्टपासून रायपूरमधील रिसॉर्टमध्ये ठेवले

झारखंडमधील सत्ताधारी यूपीए आघाडीचे सुमारे ३० आमदार रायपूरला गेले होते. सोमवारी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात सहभागी होण्यासाठी रविवारी दुपारी रांचीला परतले. या आमदारांना ३० ऑगस्टपासून रायपूरजवळील एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले होते. या सर्व आमदारांबरोबर काल (रविवारी) संध्याकाळी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी विश्वास ठरावाबाबत चर्चाही केली होती.

भाजपाचे ‘वॉक आऊट’

भाजपकडूनही रविवारी सायंकाळी आमदारांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत आजच्या विशेष अधिवेशनासंदर्भात चर्चा करण्यात आली. या बैठकीत आमदारांना अनेक सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच भाजपच्या सर्व आमदारांना अधिवेशनात सक्तीने सहभागी होण्याचे निर्देशही देण्यात आले होते. विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांनीसुद्धा भाजपाची रणनीती ठरविण्यासाठी आज सकाळी नऊच्या सुमारास बैठक घेतली होती. मात्र, एवढ्या प्रयत्नानंतरही भाजपाला ‘वॉक आऊट’ करावं लागल्याचं दिसून येत आहे.

कोणत्या पक्षाला किती आमदारांचा पाठिंबा

हेमंत सोरेन सरकारला ४९ आमदारांचा पाठिंबा आहे. ८१ सदस्यांच्या सभागृहात सर्वात मोठा पक्ष असलेल्या जेएमएमकडे सध्या ३० आमदार आहेत, काँग्रेस १८ आणि आरजेडीकडे १, तर प्रमुख विरोधी पक्ष भाजपाकडे २६ आमदार आहेत.

हेही वाचा- मोदी सरकारच्या काळात द्वेषाला खतपाणी ; राहुल गांधी यांची टीका; भाजपविरोधात एकजुटीचे विरोधकांना आवाहन

हेमंत सोरेन यांचा भाजपावर निशाणा

विश्वासदर्शक ठरावापूर्वी करण्यात आलेल्या सभागृहातील भाषणात सोरेन यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. “मी प्रत्येकावर भाष्य करत बसलो तर, हे अधिवेशनही कमी पडेल असे ते म्हणाले. या राज्यातील जनता जागी झाली आहे. त्यामुळे आम्हाला धमकावून चालणार नाही. देशाचे पंतप्रधानच जर देशातील राज्यांसोबर भांडत असतील तर, देशाचा विकास कसा होणार, असा सवाल उपस्थित करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. “आम्ही लोक कपडे, रेशन, किराणा सामान खरेदी करत असल्याचं ऐकलं आहे. पण फक्त भाजपच आमदार खरेदी करत आहे,” असा आरोप त्यांनी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jharkhand cm hemant soren wins trust vote in the assembly session dpj
First published on: 05-09-2022 at 14:41 IST