जिओचं (Reliance Jio Network Down) नेटवर्क डाऊन? भारतातील अनेक युझर्स सध्या जिओ मोबाईल नेटवर्कबाबत येणाऱ्या समस्यांची तक्रार करत आहेत. डाऊनडिटेक्टरमध्ये देखील जिओ नेटवर्कशी संबंधित युजर्सच्या तक्रारींमध्ये कमालीची वाढ झाली आहे. सोमवारी (४ ऑक्टोबर) व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम या अ‍ॅप्सची सेवा काही तासांसाठी पूर्णपणे खंडित झाल्यानंतर जिओ नेटवर्कमध्ये ही समस्या जाणवत असल्याचं निदर्शनास आलं आहे. कारण, त्यानंतरच रिलायन्स जिओ सेल्युलर नेटवर्क काही युजर्ससाठी बंद करण्यात आलं आहे.

जिओ नेटवर्कच्या या समस्येनंतर तक्रार करण्यासाठी अनेक युजर्सनी ट्विटरचा आधार घेतला आहे. या पार्श्वभूमीवर, भारतात #Jiodown हा हॅशटॅग ट्रेंड करत होता. तर डाऊनडिटेक्टरवर तब्बल ४ हजार युजर्सनी जिओ नेटवर्कसंबंधित समस्यांची तक्रार केली. #Jiodown शी संबंधित ट्विट्स पाहता बहुतेक लोक आज (६ ऑक्टोबर) सकाळपासूनच जिओ नेटवर्कच्या कनेक्टिव्हिटी समस्यांची तक्रार करत आहेत. या समस्येमुळे निश्चितच जिओ युजर्स अस्वस्थ आहेत.

आम्हाला खेद वाटतो! – Jio Care

रिलायन्स जिओचं अधिकृत कस्टमर सपोर्ट हँडल JioCare वर युजर्सच्या नेटवर्कशी संबंधित तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहेत. देशाच्या विविध भागांतील जिओ ग्राहक सध्या याबातची तक्रार करत आहेत. तर JioCare हे हँडल नेटवर्कसंबंधी समस्या असलेल्या लोकांना एक सामान्य प्रतिसाद देत आहेत. “तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्हाला खेद वाटतो. तुम्हाला इंटरनेट सेवा वापरण्यात आणि कॉल/एसएमएस करण्यात किंवा प्राप्त करण्यात मधूनमधून समस्या येऊ शकते. मात्र, हे तात्पुरतं आहे. आमची टीम शक्य तितक्या लवकर या समस्येचं निराकरण करण्यासाठी काम करत आहे.”