JioHotstar ने अल्पावधीतच मोठ्या प्रमाणावर आपला स्वतंत्र प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. आजकाल प्रवासात, घरी रिकाम्या वेळेत किंवा मग ‘बिंज वॉच’ची लहर आली की हमखास मोबाईलमधल्या JioHotstar अ‍ॅपवर बोटं फिरतात किंवा स्मार्ट टीव्हीवर जिओ हॉटस्टारचा ऑप्शन क्लिक होतो! आधी फक्त हॉटस्टार असणारं हे अ‍ॅप आता जिओ हॉटस्टार झालं आहे. आता तुमच्या मोबाईलमध्ये आणि स्मार्ट टीव्हीवर असणाऱ्या जिओ हॉटस्टार अ‍ॅपमध्ये काही भन्नाट फीचर्स येऊ घातले आहेत. स्वत: JioHotstar चे संचालक आकाश अंबानी यांनी रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत यासंदर्भात घोषणा केली आहे. तसेच, या नव्या फीचर्सचे व्हिडीओही त्यांनी दाखवले.

काय आहेत JioHotstar वरील नवे फीचर्स?

Reliance च्या वार्षिक सर्वसाधारण सभा अर्थात AGM 2025 मध्ये समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी लाखो शेअरहोल्डर्सला संबोधित केलं. यावेळी कंपनीच्या प्रगतीचा आढावा घेतानाच पुढील वर्षी Jio IPO बाजारात दाखल होत असल्याची घोषणाही त्यांनी केली. यावेळी जिओ हॉटस्टारचे संचालक आकाश अंबानी यांनी लवकरच अ‍ॅपवर येऊ घातलेल्या नवीन फीचर्सची सविस्तर माहिती दिली.

RIYA … तुमची व्यक्तिगत सहाय्यक!

“जिओ हॉटस्टारवर जवळपास ३० हजारहून अधिक तासांचे व्हिडीओ आहेत. यात असंख्य चित्रपट, ओटीटी सीरिज, रिअ‍ॅलिटी शो आणि डॉक्युमेंटरीचा समावेश आहे. एवढ्या अवाढव्य मजकुरातून आपल्याला हवा तो मजकूर शोधणं अनेकदा कठीण जातं. त्यामुळेच आम्ही RIYA ही ‘व्हॉईस कमांड सर्च असिस्टंट’ घेऊन आलो आहोत. त्यामुळे तुमच्या आवडीचा चित्रपट किंवा वेब सिरीज शोधण्यासाठी तुम्हाला फक्त रियाला सांगायचं आहे. तुम्ही जसे बोलता किंवा विचार करता, त्याप्रमाणे रिया काम करणार. मग ते तुमचे आवडते कार्यक्रम असोत, आवडत्या खेळाडूंचे रील्स असोत किंवा एखाद्या सामन्याचं सखोल विश्लेषण असो, रिया तुमच्या मदतीसाठी कायम असेल. त्यामुळे आता तुम्हाला स्वत: शोधाशोध करण्याची गरज नाही. रिया तुमच्यासाठी ते सर्व करेल”, अस आकाश अंबानी यांनी सांगितलं.

Voice Print… आवाज कलाकारांचा, भाषा तुमची!

सर्वच ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर ज्या भाषेत संबंधित चित्रपट वा ओटीटी सीरिजचं डबिंग झालं असेल, त्याच भाषेत ती पाहता येते. अनेक सीरिज किंवा चित्रपट मराठी भाषेत नसल्यामुळे मराठी प्रेक्षकांचा भ्रमनिरासही होतो. पण आता JioHotstar चं नवीन फीचर Voice Print मुळे तुम्हाला सबंधित चित्रपट वा वेब सीरिज तुमच्या भाषेत डबिंग झाली नसली, तरी AI Voice Cloning च्या मदतीने तुमच्या आवडीच्या भाषेत तुम्हाला ते पाहता येणार आहे. त्यामुळे आता मराठीत डबिंग झालेलं असो वा नसो, तो मजकूर तुम्हाला मराठी भाषेत, एवढंच नाही, तर संबंधित कलाकाराच्याच आवाजात पाहता येईल!

MaxView 3.0 … आता क्रिकेट पाहण्याचा आनंद होणार द्विगुणित!

JioHotstar वर आत्तापर्यंत क्रिकेट किंवा इतर खेळांचे सामने पाहण्यासाठी MaxView चा पर्याय देण्यात आला होता. आता लवकरच MaxView 3.0 चा पर्याय प्रेक्षकांसाठी उपलब्ध होणार आहे. मोबाईलवर क्रिकेट पाहण्याची ही आगळीवेगळी टेक्नोलॉजी जगात पहिल्यांदाच सादर होत असल्याचा दावा रिलायन्सकडून करण्यात आला आहे. मॅक्सव्यू ३.० मध्ये वेगवेगळे कॅमेरा अँगल, तुमच्या आवडीची भाषा निवडीची सोय, सामन्याचे हायलाईट्स लागलीच पाहायला मिळणे आणि सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड अवघ्या एका स्वाईपवर तुम्हाला पाहता येणार आहेत.

दरम्यान, आकाश अंबानींनी Reliance AGM च्या लाईव्हमध्ये या नवीन फीचर्ससंदर्भात घोषणा केली असली, तरी हे फीचर्स प्रत्यक्ष अॅपमध्ये कधी वापरण्यास उपलब्ध होतील याबाबत त्यांनी अद्याप कोणतीही घोषणा केलेली नसून लवकरच हे पर्याय JioHotstar युजर्सला वापरायला मिळतील, असं सांगितलं जात आहे. शिवाय, या नव्या फीचर्ससाठी युजर्सला अतिरिक्त शुल्क द्यावं लागणार की नाही? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा रिलायन्सकडून करण्यात आलेली नाही.