दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) बहुचर्चित निवडणुकीच्या निकालांचे सुरूवातीचे कल हाती आले असून यामध्ये डाव्या संघटनांनी भक्कम आघाडी घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे डाव्यांचा बालेकिल्ला असणाऱ्या जेएनयूत वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या भाजपच्या आशा धुळीला मिळण्याची शक्यता आहे. आतापर्यंत ९०० मतांची मोजणी झाली असून त्यामध्ये डाव्या संघटनांच्या आघाडीने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि बिरसा-आंबेडकर-फुले विद्यार्थी संघटना (बास्पाला) मोठ्या फरकाने पिछाडीवर टाकले आहे. सध्याचे कल पाहता चारपैकी तीन जागांवर डाव्या संघटनांनी स्पष्टपणे आघाडी घेतली आहे.
जेएनयूच्या रणसंग्रामातून कन्हैयाची माघार
जेएनयूत विद्यार्थी संघटनेच्या पदांसाठी शुक्रवारी मतदानप्रक्रिया पार पडली होती. आठ हजार ६०० विद्यार्थी मतदारांपैकी चार हजार ४४१ म्हणजेच ५९ टक्के विद्यार्थ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ६ टक्क्यांनी अधिक आहे. ‘आझादी’च्या गगनभेदी घोषणा, डफलीचा कडकडाट, कार्यकर्त्यांची लगबग आणि विद्यार्थी मतदारांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद या पाश्र्वभूमीवर शुक्रवारी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघाच्या निवडणुकीसाठीचे मतदान पार पडले. डाव्या चळवळीतील विद्यार्थी नेता आणि विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैयाकुमार याच्या अटकनाटय़ामुळे गाजत असलेल्या या विद्यापीठातील निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. यंदा या निवडणुकीसाठी संघाशी संबंधित असलेली अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तसेच बिरसा-आंबेडकर-फुले विद्यार्थी संघटना (बाप्सा) आणि डाव्या पक्षांशी संबंधित असलेल्या ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशन (आयसा) आणि स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) या तीन  संघटनांमध्ये चुरशीची लढत आहे. अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये पार पडलेल्या या निवडणुकीचा निकाल रविवारी अपेक्षित आहे.
दरम्यान, आज जाहीर झालेल्या दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटना निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) वर्चस्व कायम राखले. दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिवपदी अभाविपचे उमेदवार निवडून आले तर सहसचिवपदी नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया (एनएसयुआय) च्या उमेदवाराला संधी मिळाली आहे. अभाविपने चार पैकी तीन जागा पटकावल्या आहेत.