देशविरोधी घोषणा देण्यात आल्याच्या प्रकरणातील विद्यार्थ्यांच्या चौकशीचा अहवाल जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी दिल्ली पोलिसांना दिला आहे. कन्हैयाकुमारसह काही विद्यार्थ्यांनी ९ फेब्रुवारीच्या वादग्रस्त कार्यक्रमात अफजल गुरूला फाशी दिल्याच्या विरोधात देशविरोधी घोषणा दिल्या होत्या, असा आरोप आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कार्यालयीन अधीक्षकांकडे दिल्ली पोलिसांच्या दहशतवाद विरोधी विभागाने सदर चौकशी अहवाल मागितला होता. दहशतवाद विरोधी पोलीस पथक अफजल गुरू समर्थनार्थ कार्यक्रमाच्या अनुषंगाने दाखल करण्यात आलेल्या देशद्रोहाच्या गुन्हय़ाचा तपास करीत आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने विद्यापीठाशी संपर्क साधून चौकशी अहवालाची प्रत मागितली होती व ती आम्ही दिली आहे, असे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अफजल गुरू याच्या समर्थनार्थ कार्यक्रम घेण्याच्या प्रकरणात विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैयाकुमार, उमर खालिद व अनिरबन भट्टाचार्य यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली फेब्रुवारीत अटक करण्यात आली होती, त्यामुळे देशात त्यावर निषेध आंदोलने झाली होती. आता हे सर्व जण जामिनावर सुटले आहेत. विद्यापीठाच्या चौकशी समितीने त्यांच्या अहवालात केलेल्या शिफारशीनुसार संबंधित विद्यार्थ्यांना शिक्षा सुनावण्यात आली होती, त्यात कन्हैयाकुमारला १० हजार रुपये दंड, उमर, अनिरबन व मुजीब गट्टू यांना विविध काळासाठी विद्यापीठातून बडतर्फ करणे या शिक्षांचा समावेश आहे. एकूण १४ विद्यार्थ्यांना दंड करण्यात आला असून, दोन विद्यार्थ्यांच्या वसतिगृह सुविधा काढून घेण्यात आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jnu students inquiry report delhi police
First published on: 30-04-2016 at 00:05 IST