पीटीआय, वॉशिंग्टन

‘‘इस्रायलवर ‘हमास’ने चढवलेल्या अनपेक्षित हल्ल्याचा तपशील जसजसा आम्हाला समजत आहे. तसतसे त्यातील भयावहता स्पष्ट होत आहे.  पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना ‘हमास’ ही ‘अल कायदा’या दहशतवादी संघटनेपेक्षाही भयंकर असल्याचे त्यावरून दिसत आहे,’’ असे मत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी शुक्रवारी व्यक्त केले. फिलाडेल्फियातील ‘हायड्रोजन हब्ज’ येथे ते बोलत होते.

बायडेन म्हणाले, की २७ अमेरिकन नागरिकांसह हजारांहून अधिक निष्पाप नागरिक ‘हमास’च्या हल्ल्यात मारले गेले आहेत. हा क्रूर हिंसाचार पाहता. त्यांच्या तुलनेत ‘अल कायदा’ काही प्रमाणात ठीक आहे, असे म्हणावेसे वाटते. हे सैतान आहेत. यासंदर्भात मी वारंवार सांगितले आहे, की, या संदर्भात अमेरिकेचे धोरण अजिबात चुकीचे नाही. आम्ही इस्रायलसोबत आहोत. परराष्ट्र मंत्री अ‍ॅंटनी िब्लकन हे काल इस्रायलमध्ये होते आणि आज संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन तेथे गेले आहेत. इस्रायलकडे स्वत:चा बचाव करण्यासाठी आणि हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी असल्याची शहानिशा आम्ही करत आहोत. गाझा परिसरात मानवतेवरील संकट हटवण्याला माझे प्राधान्य आहे. आपली पथके  सूचनेनुसार या प्रदेशात काम करत आहेत. इजिप्त, जॉर्डन आणि इतर अरब देशांनी इस्रायलला अनुकूल धोरण घ्यावे, मदत करावी यासाठी संबंधित सरकार आणि संयुक्त राष्ट्रांशी आम्ही थेट संवाद साधत आहोत.

हेही वाचा >>>संजय सिंहांनी भर न्यायालयात अदाणींचं नाव घेतल्यानं न्यायाधीश संतापले; सुनावत म्हणाले, “तुम्हाला…”

बहुसंख्य पॅलेस्टिनी जनतेचा ‘हमास’ आणि त्याच्या हल्ल्याशी काहीही संबंध नाही, याची आम्हाला कल्पना आहे. आम्ही या वास्तवाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. मी एका तासाहून अधिक काळ ‘झूम कॉल’द्वारे या हल्ल्यात सर्व बेपत्ता झालेल्या अमेरिकन नागरिकांच्या कुटुंबांशी संवाद साधला. आपली बेपत्ता मुले, बालके, पत्नी, पत्नी कोणत्या स्थितीत आहे, याची त्यांना काहीच कल्पना नाही. त्यामुळे त्यांच्यावर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे, असे ते म्हणाले.