इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासमध्ये गेल्या १२ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत चार हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. गेल्या शनिवारी (७ ऑक्टोबर) हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर शेपणास्रं डागून युद्धाला सुरुवात केली. इस्रायलनेही गाझा पट्टीवर क्षेपणास्रं डागून प्रत्युत्तर दिलं. गेल्या १२ दिवसांसून दोन्ही बाजूने क्षेपणास्र हल्ला आणि गोळीबार सुरू आहे. दरम्यान, हमासचा बंदोबस्त करण्यासाठी इस्रायलने सपूर्ण गाझा पट्टीची नाकेबंदी केली आहे. गाझापट्टीला कोणतीही मानवतावादी मदत मिळणार नाही, असा प्रयत्न इस्रायली लष्कराकडून सुरू आहे.
युद्धाच्या १२ दिवसांमध्ये दोन्ही बाजूच्या हजारो लोकांचा बळी गेला आहे. तसेच हजारो कुटुंबांना स्थलांतरित व्हावं लागलं आहे. अद्याप हे युद्ध सुरूच असून इस्रायलने गाझा पट्टीची संपूर्ण नाकेबंदी केली आहे. गाझा पट्टीची वीज बंद करण्यात आली आहे. तसेच इंधन आणि पाणीपुरवठाही बंद आहे. अशातच बायडेन यांच्या सल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पॅलेस्टाईनची नाकेबंदी सैल करण्यास तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आता पॅलेस्टिनी नागरिकांना इजिप्तमार्गे औषधं आणि अन्नपुरवठा केला जाणार आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी आज (१८ ऑक्टोबर) इस्रायलचा दौरा केला. बायडेन यांनी इस्रायलमधलं मोठं व्यापारी शहर तेल अवीव येथे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची भेट घेतली आणि इस्रायल तसेच गाझा पट्टीतल्या परिस्थितीचा आढावा घेतला. दोन्ही नेत्यांमधील चर्चेनंतर बायडेन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बायडेन म्हणाले, इजिप्तच्या माध्यमातून गाझामधील सामान्य नागरिकांपर्यंत औषधं पोहोचवली जातील. यात इस्रायलही मदत करेल.
युद्ध सुरू झाल्यापासून गाझामधील अन्नपुरवठा पूर्णपणे बंद झाला आहे. लोक एक वेळच्या जेवणासाठी संघर्ष करत आहेत. डोक्यावर छत नाही, पाणी नाही, रुग्णालयांमध्ये औषधं नाहीत आणि संपूर्ण प्रदेशात कुठेही वीज नाही, इंधन नाही, अशा बिकट परिस्थितीत पॅलेस्टिनी नागरिक संघर्ष करत आहेत. त्यामुळे बायडेन यांनी इस्रायललाच ही मदत पुरवण्यास सूचवलं आहे. इस्रायलनेही त्यास सहमती दर्शवली आहे. सुरक्षित मार्गाने गाझा पट्टीतल्या नागरिकांसाठी अन्न, औषधं आणि इतर जीवनावश्यक वस्तू पोहोचवल्या जातील.
हे ही वाचा >> इस्रायल-हमास युद्धाबाबत शरद पवारांच्या भूमिकेवर केंद्रीय मंत्र्याचा संताप; म्हणाले, “ही कुजकी मानसिकता…”
यासह अमेरिकेच्या अध्यक्ष जो बायडेन यांनी गाझासाठी अमेरिकेकडून १०० मिलियन डॉलर्स (८३२ कोटी रुपये) आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. तसेच या युद्धाबाबत अमेरिकेने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही हमासच्या विरोधात आहोत, परंतु गाझात राहणाऱ्या सामान्य नागरिकांच्या बरोबर आहोत, असं बायडेन यांनी सांगितलं.