Jubliee Hills Bypoll fake voter ID cards of actress Tamannaah Bhatia Samantha ruth prabhu Rakul Preet Singh Found : देशात मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. यादरम्यान तेलंगणामधील जुबली हिल्स विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे चक्क अभिनेत्री तमन्ना भाटिया, समंथा रूथ प्रभू आणि रकुल प्रीत सिंग यांचे फोटो असलेले बनावट मतदार ओळखपत्रे सापडली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाचे अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत आहेत. न्यूज१८ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. मीडिया रिपोर्टनुसार या तिन्ही मतदार ओळखपत्रांवर एकच पत्ता देण्यात आलेला आहे.

ज्युबली हिल्स विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक ही ११ नोव्हेंबर रोजी होणार आहे, तर याची मतमोजणी ही १४ नोव्हेंबर रोजी केली जाईल. या वर्षी जून महिन्यात बीआरएसचे आमदार मगंती गोपिनाथ यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते, त्यामुळे ही पोटनिडणूक घेण्यात येत आहे.

तेलंगणामधील सत्ताधारी काँग्रेस पक्षाने व्ही. नवीन याव यांना उमेदवारी दिली आहे. तर त्यांच्या विरोधात बीआरएसने दिवंगत आमदारची पत्नी मगंती सुनिता यांना तिकीट दिले आहे. लांकाला दीपक रेड्डी हे भाजपाचे उमेदवार देखील रिंगणात आहेत.

यापूर्वी, भारत राष्ट्र समितीचे कार्यकारी अध्यक्ष के.टी. रामाराव यांनी काँग्रेसवर जुबली हिल्स मतदारसंघात हजारो बोगस मतदारांची नोंदणी केल्याचा आरोप केला होता.

“लोक काँग्रेसवर खूप संतापले आहेत, त्यामुळे त्यांना माहिती आहे की त्यांनी मते मिळणार नाहीत. त्यामुळे एकाच घरात, त्यांनी ४३ बनावट मतांची नोदणी केली आहे. प्रत्येक घऱात ४३ बनावट मते. एकूण त्यांनी हजारो बनावट मतांची नोंदणी केली आहे. आम्ही त्यावर काम करत आहोत, आवश्यक असेल त्या मार्गाने प्रत्युत्तर दिले जाईल,” असेकेटीआर म्हणाले.

यादरम्यान बीआरएसने तेलंगणा उच्च न्यायालयात ज्युबली हिल्स येथील कथित बनावट मतदारांच्या प्रकरणा याचिका दाखल केली आहे.

बीआरएस पक्षाच्या जुबली हिल्सच्या उमेदवार मागांती सुनिता यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणी वेळी, उच्च न्यायालयाने या प्रकरणात कोणतेही निर्देश देण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. राज्य निवडणूक आयोग आधीच मतदार याद्यांमध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया करत असल्याने, न्यायालय पुढील कोणतेही आदेश जारी करू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने न्यायालयात माहिती दिली की, बीआरएस नेत्यांच्या तरारीनंतर त्यांनी आधीच जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना प्रकरणाच्या पडताळणीचे आदेश दिले आहेत.