भारताचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान सरन्यायाधीश यू यू लळित यांच्या निवृत्तीनंतर म्हणजेच ९ नोव्हेंबरपासून न्यायमूर्ती चंद्रचूड भारताचे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्या. चंद्रचूड यांची नियुक्ती केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तत्पूर्वी भारताचे विद्यमान सरन्यायाधीश यूयू लळित यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती धनंजय वाय चंद्रचूड यांची शिफारस केली होती. न्यायमूर्ती चंद्रचूड हे अयोध्या जमीन विवाद आणि गोपनीयतेचा अधिकार यासारख्या ऐतिहासिक निकालांचा भाग आहेत.

हार्वर्ड विद्यापीठातून कायद्याच्या दोन पदव्या प्राप्त केल्यानंतर, न्यायमूर्ती चंद्रचूड यांची वयाच्या ३९ व्या वर्षी वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त करण्यात आली. ते भारतातील सर्वात तरुण वकील बनले. यानंतर लगेचच, १९९८ मध्ये त्यांना भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती देण्यात आली. वकीली करत असताना न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी ओक्लाहोमा विद्यापीठात ‘आंतरराष्ट्रीय कायदा’ विषय शिकवला. तसेच त्यांनी मुंबई विद्यापीठातही अध्यापक (व्हिजिटींग) म्हणून काम केलं आहे.

न्यायमूर्ती चंद्रचूड यांची २०१३ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर तीन वर्षांत त्यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली. न्यायमूर्ती चंद्रचूड हे सर्वाधिक काळ सेवा बजावलेल्या माजी सरन्यायाधीश वाय व्ही चंद्रचूड यांचे पुत्र आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Justice dy chandrachud appointed as the 50th chief justice of india by president draupadi murmu rmm
First published on: 17-10-2022 at 19:42 IST