मद्रास उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशाला, त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असताना सर्वोच्च न्यायालयात बढती देऊन तत्कालीन सरन्यायाधीश के.जी.बाळकृष्णन यांनी अपकीर्ती ओढवून घेतली, असा आरोप प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष व सर्वोच्च न्यायालयातील माजी न्यायाधीश मरकडेय काटजू यांनी केला आहे.
ते म्हणाले, की न्या. बाळकृष्णन यांच्या नेतृत्वाखालील जे न्यायाधीश निवड मंडळ होते, त्यात न्या. एस.एच कपाडिया यांचाही समावेश होता. तामिळनाडूतील वकिलांनी त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे ढीगभर पुरावे देऊनही त्यांनी मद्रास उच्च न्यायालयातील न्यायाधीशास सर्वोच्च न्यायालयात आणले. न्या. बाळकृष्णन हे मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष असून ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाहीत.
काटजू यांनी अलिकडेच लिहिलेल्या ब्लॉगला उत्तर देताना कपाडिया यांनी म्हटले आहे, की आपण कुठल्याच अयोग्य न्यायाधीशाला सर्वोच्च न्यायालयात आणले नाही. काटजू यांनी त्यावर म्हटले आहे, की ते न्यायाधीश मद्रास उच्च न्यायालयाचे होते व त्या वेळी आपण तेथे मुख्य न्यायाधीश होतो त्यांच्या अपकीर्तीविषयी आपल्याला माहिती होती व नंतर त्यांना एका उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश करून नंतर सर्वोच्च न्यायालयात बढती देण्यात आली. एकदा मधल्या सुटीच्या वेळी आपण कपाडिया यांच्या कक्षात जाऊन त्यांना त्या न्यायाधीशाच्या कारनाम्यांची माहिती दिली व तुम्ही निवड मंडळात आहात, त्यामुळे योग्य तो निर्णय घ्या असे त्यांना बजावले होते. न्या. बाळकृष्णन यांनीही त्या न्यायाधीशाची सर्वोच्च न्यायालयातील बढती लावून धरली. आपण चांगली माहिती दिलीत त्यामुळे आभार मानतो असे कपाडिया म्हणाले होते. तरीही त्याच न्यायाधीशांची नेमणूक झाली. कपाडिया अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असताना आपण त्यांना तेथील एका न्यायाधीशाचे मध्यस्थ असलेल्या तीन जणांचे मोबाइल नंबर दिले होते, या न्यायाधीशांविरोधात गंभीर आरोप होते व त्यामुळे हे नंबर गुप्तचरांकडून टॅप करावेत असेही त्यांना सुचवले होते असे काटजू सांगतात. कपाडिया यांनी त्या फोनवरचे संभाषणानुसार ते न्यायाधीश भ्रष्ट असल्याचे आपल्याला सांगितले पण त्या न्यायाधीशांवर कारवाई केली नाही, असे काटजू यांनी म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Aug 2014 रोजी प्रकाशित
मद्रास उच्च न्यायालयातील भ्रष्ट न्यायाधीशास न्या. बाळकृष्णन यांच्या निवड मंडळाकडून बढती
मद्रास उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशाला, त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असताना सर्वोच्च न्यायालयात बढती देऊन तत्कालीन सरन्यायाधीश के.जी.बाळकृष्णन यांनी अपकीर्ती ओढवून घेतली,
First published on: 12-08-2014 at 12:42 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Justice katju targets former cji balakrishnan accuses him of overlooking corruption