देशाचे ४६ वे सरन्यायाधीश म्हणून रंजन गोगोई यांनी बुधवारी शपथ घेतली. गोगोई यांचा कार्यकाळ नोव्हेंबर २०१९ पर्यंत असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मावळते सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी सप्टेंबरमध्ये सेवाज्येष्ठतेनुसार गोगोई यांच्या नावाची शिफारस सरन्यायाधीशपदासाठी केली होती. त्यांच्या नियुक्तीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिल्यानंतर कायदा मंत्रालयाने अधिसूचना जारी करत गोगोई यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले होते. दीपक मिश्रा यांचा कार्यकाळ संपला असून बुधवारी रंजन गोगोई यांनी सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गोगोई यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. गोगोई यांचा कार्यकाळ नोव्हेंबर २०१९ पर्यंत असून त्यांना एकूण १३ महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे.

दीपक मिश्रा यांच्या कामकाजाविरोधात जानेवारीमध्ये सुप्रीम कोर्टातील चार वरिष्ठ न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेतली होती. न्या जे. चेलमेश्वर, न्या. मदन बी. लोकूर, न्या. कुरियन जोसेफ यांच्यासह न्या. रंजन गोगोई यांचा समावेश होता. या चौघांनी दीपक मिश्रा यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत प्रश्न उपस्थित केले होते.

वाचा: वकिलांसमोर सरन्यायाधीशांची संपत्ती नगण्य! प्रख्यात वकिलांची दिवसाची फी ५० लाख

न्या. रंजन गोगोई यांची बहुतांश कारकिर्द गुवाहाटी उच्च न्यायालयात गेली. त्यांची २००१ मध्ये गुवाहाटी उच्च न्यायालयातील न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. यानंतर २०१० मध्ये त्यांची पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली. २३ एप्रिल २०१२ पासून ते सुप्रीम कोर्टात न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Justice ranjan gogoi sworn in as chief justice of india at rashtrapati bhavan
First published on: 03-10-2018 at 11:04 IST