Jyoti Malhotra : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या सहा जणांना हरियाणामधून अटक करण्यात आली आहे. यामध्ये यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिचा समावेश आहे. ज्योतीला हिसारच्या सिव्हिल लाईन्स पोलिसांनी अटक केली असून तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ती पाकिस्तानमधील गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती, असा आरोप करण्यात आला आहे. ज्योती मल्होत्रा ऊर्फ ज्योती रानी यूट्यूबवर ट्रॅव्हल विथ जो असं तिच्या यूट्यूब चॅनलचं नाव असून तिने दोन वेळा पाकिस्तानला देखील भेटी दिल्याची माहिती समोर आली आहे.

एवढंच नाही तर तिने पाकिस्तान भेटीदरम्यान अनेक व्हिडीओ देखील बनवले आहेत. दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार, ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी गुप्तचर संस्थेमधील अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती आणि व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅट सारख्या ॲप्सच्या माध्यमातून ती भारतातील संवेदनशील माहिती पुरवत असल्याचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, आता ज्योती मल्होत्राच्या वडिलांची यावर प्रतिक्रिया समोर आली असून ती यूट्यूब व्हिडीओंसाठी पाकिस्तानला गेली होती, असं त्यांनी म्हटलं आहे.

ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी काय म्हटलं?

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राचे वडील हरिस मल्होत्रा ​​यांनी म्हटलं की, “माझी मुलगी व्हिडीओ शूट करण्यासाठी देशात आली होती, तसेच ती सीमेपलीकडील मित्रांशी संपर्क का करू शकत नाही?”, असं म्हणत ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी तिचा बचाव केला आहे. तसेच पोलिसांनी संपूर्ण कुटुंबाचे फोन, बँक स्टेटमेंट, लॅपटॉप जप्त केल्याचा दावा ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी केला आहे. तसेच अधिकाऱ्यांनी आपले फोन परत देण्याची विनंती देखील त्यांनी केली आहे.

“तसेच ज्योती मल्होत्रा यूट्यूब व्हिडीओ शूट करण्यासाठी पाकिस्तान आणि इतर ठिकाणी जायची. जर तिचे काही मित्र तिथे असतील तर ती त्यांना फोन करू शकत नाही का? माझी कोणतीही मागणी नाही, पण आमचे फोन आम्हाला द्या. आमच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे”, असं ज्योती मल्होत्राचे वडील हरीस मल्होत्रा ​​यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं असल्याचं इंडिया टुडेनी दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

ज्योती मल्होत्रा पाकिस्तानला माहिती कशी पुरवायची?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी गुप्तचर संस्थेमधील अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती आणि व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅट सारख्या ॲप्सचा वापर करून ती भारतातील संवेदनशील माहिती पुरवत होती. पाकिस्तानचे गुप्तचर विभागातील अधिकारी शाकीर आणि राणा शाहबाज यांचाही फोन नंबर ज्योतीच्या मोबाइलमध्ये सेव्ह असल्याचे दिसून आले. कुणाला संशय येऊ नये म्हणून हे मोबाइल नंबर तिने जट रंधावा या नावाने सेव्ह केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्योती मल्होत्रासह दिसलेला पाकिस्तानी अधिकारी दानिश कोण?

२०२३ मध्ये ज्योती पाकिस्तानला गेली होती. त्यावेळी व्हिसासाठी ती दिल्ली येथील पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयात पोहचली होती. तिची ओळख तेथील दानिशशी म्हणजेच एहसान-उर-रहीम आलियास याच्याशी झाली होती. या दोघांमध्ये जवळीक झाली. दानिशच्या मदतीने ती पाकिस्तानात पोहचली. तिथे ती पाकिस्तानातील गुप्तहेरांच्या संपर्कात आली. दुसऱ्या यात्रेदरम्यान ती पाकिस्तानातील अली अहसान आणि शाकिर उर्फ राणा शहबाज सारख्या एजंटांच्या संपर्कात आल्याचे तपास यंत्रणांच्या चौकशीत समोर आले. ती या एजंटशी विविध सोशल अकाऊंटवरून संपर्कात असल्याचे उघड झाले आहे. त्याला भारताने देश सोडण्यास सांगितलं. १३ मे रोजी त्याला देश सोडण्याचा आदेश देण्यात आला.