महात्मा गांधींवर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या कालीचरण महाराजला जामीन मिळाला असून तो तुरुंगावर बाहेर आला आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर कालीचरण महाराज इंदूरला गेला. तिथे त्याच्या समर्थकांनी त्याचे विमानतळावर भव्य स्वागत केले. यादरम्यान कालीचरण महाराजने महात्मा गांधींवर आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आणि मी खरं बोलल्याबद्दल मला शिक्षा झाली आहे, असं तो म्हणाला.


कालीचरण महाराजचे मध्य प्रदेशातील इंदूर विमानतळावर त्याच्या समर्थकांनी जोरदार स्वागत केले, त्यानंतर माध्यमांशी बोलत होता. यावेळी एका पत्रकाराने विचारले की, तुम्ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती, त्याबद्दल तुम्हाला खेद वाटतो का? प्रत्युत्तरात कालीचरण महाराज म्हणाला, “नाही, मला माझ्या वक्तव्याचा काहीच पश्चाताप नाही. कलियुगात सत्य बोलल्याबद्दल मला शिक्षा झाली आहे.”


कालीचरण महाराजने काय म्हटलं होतं?


गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये छत्तीसगडमधील रायपूर येथे झालेल्या धर्म संसदेत कालीचरण महाराजने महात्मा गांधी यांच्यासाठी आक्षेपार्ह शब्द वापरले होते. त्याचवेळी त्याने महात्मा गांधींच्या हत्येसाठी नथुराम गोडसेंना नमन केलं होतं. या घडामोडीनंतर छत्तीसगडमध्ये अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी एफआयआर दाखल केला होता. यानंतर कालीचरण महाराजला मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली होती.


१ एप्रिल रोजी बिलासपूर कोर्टाने कालीचरण महाराजला जामीन मंजूर केला होता. कालीचरण महाराजच्या जामीन अर्जाला सरकारी वकिलांनी कडाडून विरोध केला, मात्र तरीही त्याला जामीन देण्यात आला. सरकारी वकिलांनी जामीन अर्जाला विरोध करताना सांगितले की, कालीचरण महाराज बाहेर आल्यावर जातीयवाद पसरवू शकतो. तर, तीन महिन्यांपासून तुरुंगात असल्यामुळे त्याला जामीन मिळावा, अशी मागणी कालीचरण महाराजच्या वकिलांनी केली होती.