scorecardresearch

…अन् ८५ मिनिटांसाठी कमला हॅरिस झाल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष

कमला हॅरिस ‘वर्ल्ड पॉवर’ मानल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या उपाध्यक्षपदी निवड झालेल्या पहिल्या भारतीयच नाही, तर आशियायी व्यक्ती ठरल्या. आता त्यांच्या नावावर आणखी एक विक्रम झालाय.

…अन् ८५ मिनिटांसाठी कमला हॅरिस झाल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष

कमला हॅरिस ‘वर्ल्ड पॉवर’ मानल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या उपाध्यक्षपदी निवड झालेल्या पहिल्या भारतीयच नाही, तर आशियायी व्यक्ती ठरल्या. आता त्यांच्या नावावर आणखी एक विक्रम झालाय. आता त्या ८५ मिनिटांसाठी अमेरिकेच्या अध्यक्ष देखील झाल्या आहेत. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी स्वतः शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) आपले राष्ट्राध्यक्ष म्हणून सर्व अधिकार कमला हॅरिस यांना दिले. बायडन यांचे माध्यम सचिव जेन साकी यांनी याबाबत माहिती दिली.

बायडन यांनी हॅरिस यांना राष्ट्राध्यक्षपदाचे अधिकार देण्याचं कारण काय?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडन यांची दैनंदिन आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी त्यांची कोलोनोस्कोपीची चाचणी करण्यात येणार होती. या चाचणीसाठी त्यांना काही वेळ भूल देण्यात येणार होती. त्यामुळे या काळात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे सर्व अधिकार बाडयन यांनी कमला हॅरिस यांना दिले. बायडन यांच्या शरिराची पूर्ण तपासणी अमेरिकेतील वॉल्टर रिड नॅशनल मिलिटरी मेडिकल सेंटरमध्ये करण्यात आली.

अमेरिकेचं अध्यक्षपद स्विकारल्यानंतर जो बायडन यांची ही पहिली ‘फूल बॉडी एक्झामिनेशन’ (Full Body Examination) आहे. ही चाचणी पूर्ण झाल्यानंतर बायडन यांनी सकाळी ११ वाजून ३५ मिनिटांनी कमला हॅरिस आणि व्हॉईट हाऊसचे चिफ ऑफ स्टाफ रोन क्लेन यांच्याशी चर्चा करून पुन्हा कार्यभार स्विकारला.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी काम करणाऱ्या पहिल्या महिला

अमेरिकेच्या अध्यक्षपदावर काम करणाऱ्या कमला हॅरिस पहिल्या महिला ठरल्या आहेत. याआधी त्या उपाध्यक्ष पदावर काम करणाऱ्या पहिला आशियायी महिला ठरल्या होत्या. हॅरिस यांच्याकडे १९ नोव्हेंबरला सकाळी १० वाजून १० मिनिटांनी राष्ट्राध्यक्षपदाचे अधिकार आले. ते ११ वाजून ३५ मिनिटांपर्यंत होते. नंतर बायडन शुद्धीत आल्यावर पुन्हा हे अधिकार बाडयन यांच्याकडे गेले.

अमेरिकेत असं याआधी घडलंय?

२००२ आणि २००७ मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदावर जॉर्ज डब्ल्यू बुश असताना त्यांना देखील अशाच प्रकारे आपले अधिकार हस्तांतरीत करावे लागले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या