Kangana Ranaut on Trump and PM Modi: अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत आपल्या बेधडक विधानांसाठी प्रसिद्ध आहे. रोखठोक विधाने करून त्यावरून मागे न हटणाऱ्या कंगनाचे एक नवीन रुप पाहायला मिळाले आहे. काही वेळापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणारी एक पोस्ट कंगनाने एक्सवर शेअर केली होती. मात्र भाजपाचे नेते जेपी नड्डा यांच्या सांगण्यावरून कंगनाने सदर पोस्ट डिलीट केली. तसेच त्यावर दिलगिरी व्यक्त करणारी नवी पोस्टही टाकली.
कंगना रणौतने डिलीट केलेली पोस्ट काय होती?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲपलचे सीईओ टिम कुक यांना भारतात आयफोनची निर्मिती करू नये, असे सांगितले. या बातमीवर खासदार कंगना रणौतने टीका केली. ‘या प्रेमभंगाचे कारण काय असू शकते?’, असा प्रश्न उपस्थित करून कंगनाने काही मुद्दे मांडले होते.
यात पहिला मुद्दा होता, १) ते अमेरिकेचे अध्यक्ष असले तरी जगात सर्वात लोकप्रिय भारताचे पंतप्रधान आहेत. २) ट्रम्प यांचा दुसरा कार्यकाळ आहे, तर आमच्या पंतप्रधानांची ही तिसरी टर्म आहे. ३) निःसंशयपणे ट्रम्प ‘अल्फा मेल’ आहेत, पण आमचे पंतप्रधान सर्व अल्फा मेलचे बाप आहेत. हे तीन मुद्दे मांडल्यानंतर ‘तुम्हाला काय वाटते?’, असा प्रश्न नेटिझन्सना विचारला होता.
नंतर पोस्ट केली डिलीट
कंगना रणौतच्या पोस्टला सोशल मीडियावर अतिशय कमी वेळात प्रसिद्धी मिळाली. मात्र भाजपा नेत्यांकडून आक्षेप घेतल्यानंतर सदर पोस्ट डिलीट करण्यात आली. त्यानंतर केलेल्या नव्या पोस्टमध्ये कंगनाने म्हटले, “आमचे आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मला फोन करून सदर पोस्ट डिलीट करण्यास सांगितले. ट्रम्प यांनी टिम कुक यांना भारतात उत्पादन करू नये, असे सांगितले होते. त्यावर मी पोस्ट टाकली होती.”
“सदर पोस्ट माझे वैयक्तिक मत होते आणि ते सोशल मीडियावर शेअर केल्याबद्दल मला वाईट वाटते. मला सूचना दिल्यानंतर मी इन्स्टाग्रामवरूनही सदर पोस्ट डिलीट केली आहे. धन्यवाद”, असेही कंगना रणौतने स्पष्ट केले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोहा येथे अॅपल कंपनीला भारतात आयफोन न बनवण्याचे आवाहन केले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी टिम कुक यांच्याशी चर्चा झाल्याचा दावा करत म्हटले की, भारतात ॲपलच्या उत्पादनांची निर्मिती करण्याबाबत मी फार समाधानी नाही.