Kangana Ranaut Viral Video : हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या खासदार आणि बॉलीवुड अभिनेत्री कंगना राणौत यांनी गुरूवारी (१८ सप्टेंबर) रोजी कुल्लू जिल्ह्यातील मनालीमधील सोलंग आणि पलचान या आपत्तीग्रस्त भागांना भेट दिली. येथे त्यांनी पीडित नागरिकांशी संवाद साधला आणि परिस्थितीचा आढावा घेतला. यादरम्यान जेव्हा एक महिला कंगना रणौत यांना आपले दुख: सांगू लागली तेव्हा तिचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी त्यांनी आपल्याच अडचणींचा पाढा वाचण्यास सुरूवात केली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
जेव्हा ही महिला पावसामुळे झालेल्या नुकसानीची तक्रार करू लागली तेव्हा कंगना रणौत यांनी आपली वेदना सांगण्यास सुरूवात केली. त्यांनी त्याच भागात असलेल्या आपल्या रेस्टॉरंटमध्ये काल फक्त ५० रुपयांचा व्यवसाय झाला असून आपण १५ लाख रुपये पगार देत असल्याचेही नमूद केले. त्यांच्या मतदारसंघात आलेल्या पुराबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या की लोकांनी त्यांच्या स्थितीचाही विचार केला पाहिजे.
त्या म्हणाल्या की, “माझं घरही येथेच आहे. मी कोणत्या परिस्थितीतून जात असेल हेही लक्षात घ्या. माझे रेस्टॉरंटही येथेच आहे… त्यामध्ये काल ५० रुपयांचा बिझनेस झाला आहे. १५ लाख रुपये तर पगारच आहे आणि ५० रुपये बिझनेस झाला आहे. मी कोणत्या स्थितीतून जात आहे, माझी वेदना देखील तुम्ही समजून घ्या…. मी देखील माणूसच आहे.. मी देखील एकटीच आहे, या समाजात तुमच्याप्रमाणेच सिंगल वुमन आहे… माझी अडचणही समजून घ्या. माझ्यावर असा हल्ला करू नका….”
वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, भाजपा खासदार कंगना या जेव्हा अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहाणी करण्यासाठी पोहचल्या तेव्हा त्यांना ‘कंगना परत जा, तुम्ही उशीर केला’ अशा आशयाच्या घोषणांचा सामना करावा लागला.
राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन, पूर असा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. लोक बेघर झाले आहेत. यादरम्यान कंगना रणौत यांचे हे विधान आले आहे. या वर्षाच्या सुरूवातीलात कंगना रणौत यांनी मनाली येथे त्यांचे द माउंटन स्टोरी नावाचे रेस्टॉरंट सुरू केले आहे. याचा त्यांनी सोशल मीडियावरून प्रचार देखील केला होता. हा भाग बऱ्यापैकी पर्यटनावर अवलंबून असल्याने येथे झालेला भीषण पाऊस आणि भूस्खलन यामुळे कॅफेच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे.
हिमालच प्रदेश स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर (SEOC) ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २० जूनपासून सुरू झालेल्या मान्सून हंगामात राज्यभरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
राज्यात आतापर्यंत किमान ४१९ लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यापैकी २३७ मृत्यू पावसाशी संबंधित घटनांध्ये झाले आहेत. यामध्ये ५२ जणांचा मृत्यू भूस्खलनामुळे, ४५ जणांचा मृत्यू उतारावरून घसरून पडल्याने, ४० जणांचा बुडून, १७ जणांचा ढगफुटीमुळे आणि ११ जणांचा अचानक आलेल्या पुराने झाला आहे. याच कालावधीत, रस्ते अपघातांमध्ये किमान १८२ लोकांचा मृत्यू झाला आहे.