चंदीगढ विमानतळावरून दिल्लीला जात असताना नवनिर्वाचित खासदार कंगना रणौत यांना एका अपमानजनक प्रसंगाचा सामना करावा लागला. विमानतळावरील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौर यांनी त्यांच्या कानशिलात लगावली. याप्रकरणी अधिक चौकशी केली असता संबंधित महिला ही शेतकरी आंदोलनाशी निगडीत होती, असं समजलं. कंगना यांनी पूर्वी केलेल्या वक्तव्याचा राग मनात धरून कॉन्स्टेबलने त्यांच्या थोबाडीत मारली. दरम्यान, याप्रकरणी कुलविंदर कौर या महिलेला निलंबित करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणात कुलविंदर कौर यांचा भाऊ शेरसिंग महिवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगना राणौतने विजय मिळवल्यानंतर दोन दिवसांनी झालेल्या या घटनेवर प्रतिक्रिया देताना शेर सिंग महिवाल म्हणाले, “चंदीगड विमानतळावर काहीतरी घडल्याचे मला माध्यमांद्वारे समजले. कंगना यांचा मोबाईल आणि पर्स तपासत असताना ही घटना घडली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान कंगनाने सांगितले होते की १०० रुपयांसाठी महिला तिथे आहेत.”

“यामुळे माझी बहिण रागावली असावी. त्यामुळे ही घटना घडली. सैनिक आणि शेतकरी दोघेही महत्त्वाचे आहेत आणि प्रत्येकजण आपलं कर्तव्य पार पाडत असतात. आम्ही तिला या प्रकरणात पूर्ण पाठिंबा देतो”, असं ते म्हणाले. शेरसिंह महिवाल हे शेतकरी नेते आहेत. कपूरथला येथील किसान मजदूर संघर्ष समितीमध्ये त्यांनी संघटना सचिवपदही भूषवले आहे. दरम्यान, विमानतळाची सुरक्षा पुरवणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेशही दिले आहेत.

हेही वाचा >> भाजपा खासदार कंगना रणौत यांना कानशिलात लगावल्याचं प्रकरण, नाना पाटेकर म्हणाले, “जे घडलं ते…”

कोण आहेत कुलविंदर कौर?

कंगना रणौत यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप असलेल्या कुलविंदर कौर या सीआयएसफमध्ये कॉन्स्टेबल आहेत. त्या ३५ वर्षीय आहेत. त्यांचं कुटुंब सुल्तानपूर येथील लोधी या ठिकाणी राहतं. मागच्या १५ वर्षांपासून कुलविंदर कौर या सीआयएसएफमध्ये काम करतात. आजवर त्यांच्या कारकिर्दीला कुठलाही कलंक लागलेला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुलविंदर कौर या कर्तव्य बजावत असताना कधीही त्यात कसूर करत नाहीत. हे त्यांचं १५ वर्षांचं रेकॉर्ड सांगतं आहे. कुलविंदर कौर या कपूरथला या ठिकाणी त्यांच्या पतीसह राहतात. त्यांना दोन मुलं आहेत. त्यांचा भाऊ शेर सिंह हे शेतकरी नेते आहेत. तर किसान मजदूर संघर्ष समितीत ते सचिव आहेत. या सगळ्या प्रकारानंतर अभिनेते नाना पाटेकर यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.