जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते कन्हैय्या कुमार यांनी आज राहुल गांधीच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी माध्यमांशी बोलताना कन्हैय्या कुमार याने आपल्या भावना व्यक्त केल्या. पंतप्रधान फक्त नावाला आहेत, देशाला फक्त काँग्रेसच वाचवू शकते, असं मत कन्हैय्या कुमार यांनी व्यक्त केलं आहे.
यावेळी बोलताना कन्हैय्या कुमार म्हणाले, जर काँग्रेस वाचली नाही तर देश वाचणार नाही, असं फक्त मलाच नाही तर देशातल्या सर्व तरुणांना वाटू लागलं आहे. आज जेव्हा आम्ही राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षप्रवेशाचा अर्ज भरत होतो, तेव्हा जिग्नेश यांनी त्यांना संविधानाची प्रत भेट दिली आणि मी त्यांना भगतसिंग, गांधी आणि आंबेडकरांची प्रतिमा दिली. कारण आज या देशाला आंबेडकरांच्या समानतेची, भगतसिंगांच्या शूरतेची आणि गांधीच्या एकतेची गरज आहे.




ते पुढे म्हणाले, आज या देशात भारतीय होण्याची जी ओळख आहे, ज्यात सत्तेला आव्हान देण्याचं सामर्थ्य आहे. त्या भारतीय चिंतन परंपरेला वाचवण्याची आज गरज आहे. म्हणून मी काँग्रेसमध्ये सामील झालो आहे. कारण हाच तो पक्ष आहे जो महात्मा गांधी, सरोजिनी नायडू, आंबेडकर, नेहरु, भगतसिंग यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. समानता आणि समता ही कोणा एका व्यक्तीपुरती मर्यादित नाही, तो भारताचा इतिहास आहे. आणि भारताच्या या इतिहासाला काँग्रेस या देशातल्या सर्वात जुन्या पक्षाने आपल्यात सामावून घेतलं आहे. त्यामुळे मला असं लक्षात येत आहे की देशात भाजपासमोर इतर कोणताही पर्याय नाही. त्यामुळे काँग्रेस या सर्वात जुन्हा पक्षाला वाचवलं नाही, मोठ्या जहाजाला वाचवलं नाही, तर इतर छोटी जहाजंही बुडून जातील.