लखनऊ : पोलिसांनी गोरखपूरमधील एका हॉटेलवर छापा घातल्यानंतर तेथे असलेला कानपूरचा उद्योजक मनीष गुप्ता तेथून पळून जाण्याच्या प्रयत्नात पडल्याने डोक्याला इजा होऊन मरण पावला, असा दावा उत्तर प्रदेश पोलिसांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने गुरुवारी केला. गुप्ता हा रुग्णालयात उपचारादरम्यान मरण पावल्याचेही त्याने सांगितले.

मनीष गुप्ता याच्या खुनाच्या आरोपाखाली ६ पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात आले असताना आणि दोषींची गय केली जाणार नाही असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले असताना अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी हे निवेदन जारी केले आहे.

हॉटेलवर छापा घालणाऱ्या काही पोलिसांनी गुप्ता याला कथितरीत्या मारहाण केल्यानंतर सोमवारी रात्री तो मरण पावला होता. मद्यप्राशन केलेला गुप्ता खाली पडल्यानंतर त्याच्या डोक्याला इजा झाली व त्यामुळे तो मरण पावला, अशी भूमिका पोलिसांनी आधीही घेतली होती. मात्र नंतर अधिकाऱ्यांनी सहा पोलिसांना निलंबित करून त्यांच्यावर खूनप्रकरणी गुन्हा दाखल केला.

हॉटेलच्या तपासणीदरम्यान गुप्ता याने पोलिसांना चौकशीत सहकार्य केले नाही, असे कुमार यांनी पत्रकारांना सागितले. ‘गोरखपूरमध्ये सर्वत्र तपासणी करण्याचा आदेश पोलीस अधीक्षकांनी दिला होता. त्यानुसार संबंधित हॉटेलची तपासणी केली असता तेथे तीनजण एका खोलीत आढळले. त्यापैकी दोघांजवळ ओळखपत्र होते, मात्र तिसऱ्याजवळ ते नव्हते. याबबत विचारणा केली असता त्याने (मनीष) सहकार्य केले नाही व पळून जाण्याचा प्रयत्न केला’, असे कुमार म्हणाले.