कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी गुरुवारी भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. कर्नाटकमध्ये २०१८ मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत १५० जागाजिंकून स्पष्ट बहुमत मिळविण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य येडियुरप्पा यांनी ठरविले आहे.
कर्नाटकमधील काँग्रेस हे बुडणारे जहाज आहे, त्यामुळे काँग्रेसमुक्त भारत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रथम काँग्रेसमुक्त कर्नाटक उद्दिष्ट साध्य करावे आणि त्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी, असे आवाहन येडियुरप्पा यांनी केले.
कर्नाटक विधानसभेत सध्या भाजपचे केवळ ४७ आमदार आहेत, ही संख्या पुढील निवडणुकीत १५० करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत, असेही ते म्हणाले. येडियुरप्पा हे आक्रमक नेतृत्वासाठी कार्यकर्त्यांमध्ये प्रसिद्ध आहेत.
कर्नाटकमधील नऊ जिल्ह्य़ांमध्ये भाजपचे अस्तित्वच नाही, १३ जिल्ह्य़ांमध्ये केवळ एकच आमदार आहे आणि बंगळुरू आणि बेळगावीमध्ये २१ आमदार आहेत, आपण कोठे आहोत याचा आणि आपल्याला कोठे पोहोचावयाचे आहे याचा विचार करावा, असेही ते म्हणाले.