Karnataka BJP expels MLAs Somashekar & Hebbar : पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीने त्यांच्या दोन आमदारांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. आमदार एस. टी. सोमशेखर व शिवराम हेब्बर या दोघांना पक्षातून काढून टाकण्यात आलं आहे. राज्यसभा निवडणुकीवेळी एस. टी. सोमशेखर यांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तर, शिवराम हेब्बर हे राज्यसभा निवडणुकीच्या मतदानावेळी गैरहजर राहिल्याने पक्षाच्या शिस्तपालन समितीने त्यांच्यावर कारवाई केली आहे.

दरम्यान, ही कारवाई करण्यापूर्वी भाजपाच्या मुख्य प्रतोदांनी दोन्ही आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्याकडून रितसर उत्तर मागितलं होतं. दोन्ही आमदारांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. तरीही पक्षाने त्यांच्याविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे.

सोमशेखर व हेब्बर यांचा नेमका गुन्हा काय?

फेब्रुवारी महिन्यात कर्नाटकमध्ये राज्यसभेच्या चार जागांसाठी मतदान घेण्यात आलं होतं. या चारपैकी तीन जागांवर काँग्रेसचे उमेदवार जिंकले, तर एका जागेवर भाजपा उमेदवाराला विजय मिळाला. व्हिप जारी केल्यानंतरही एस. टी. सोमशेखर यांनी काँग्रेसचे उमेदवार अजय माकन यांच्या बाजूने मतदान केल्याचं पक्षाच्या अभ्यासात निष्पन्न झालं आहे. सोमशेखर यांच्या क्रॉस व्होटिंगमुळे व शिवराम हेब्बर यांच्या मतदान न करण्यामुळे भाजपाचा केवळ एकच उमेदवार राज्यसभेची निवडणूक जिंकू शकला.

आमदार सोमशेखर व आमदार हेब्बर हे गेल्या काही महिन्यांपासून पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. या नाराजीमुळेच त्यांनी पक्षाच्या विरोधात कारवाया केल्याचं बोललं जात आहे. परिणामी पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एस. टी. सोमशेखर कर्नाटकमधील यशवंतपूर मतदारसंघातून निवडून आले आहेत. तर शिवराम हेब्बर हे येल्लापूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात.