“आता भाजपा कार्यकर्त्याला कुणी हात लावला, तर….”, भाजपा मंत्र्याच्या विधानावरून वाद

भाजाप कार्यकर्त्याला हात लावल्यास त्याला सडेतोड उत्तर देण्याचे आदेश असल्याचं विधान कर्नाटकमधील भाजपा मंत्र्याने केलं आहे.

k s eshwarappa
के. एस. इश्वरप्पा (संग्रहीत छायाचित्र)

राजकीय वर्तुळात नेहमीच काही नेतेमंडळी आपल्या विधानांमुळे कायम चर्चेत राहात असतात. त्यातली काही कायम वादात देखील येत असतात. कर्नाटकचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री के. एस. इश्वरप्पा यांच्या विधानांवरून देखील वाद निर्माण झाल्याची काही प्रकरणं घडली आहेत. नुकतंच इश्वरप्पा यांनी केलेलं एक विधान वादात सापडलं असून त्यावरून काँग्रेसकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे. तसेच, इश्वरप्पा यांच्या राजीनाम्याची देखील मागणी करण्यात आली आहे. दुसरीकडे इश्वरप्पा यांनी देखील “मी माझ्या विधानावर ठाम आहे”, अशी भूमिका घेतली आहे.

नेमकं झालं काय?

कर्नाटकमधील भाजपाचे प्रभावी नेते आणि मंत्रिमंडळातील एक ज्येष्ठ मंत्री के. एस. इश्वरप्पा यांनी रविवारी त्यांच्या शिमोगा मतदारसंघात भाजपा कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत बोलताना त्यांनी भाजपाची ताकद वाढल्याचं सांगितलं. “आज, भाजपाचा जगभरात प्रसार झाला आहे. आणि जर भाजपाच्या कार्यकर्त्याला जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात कुणी हात जरी लावला, तरी त्याला त्याच पद्धतीने उत्तर देण्याचे आपल्याला आदेश आहेत. याआधी कोणत्याही परिस्थितीत शांत राहण्याचे निर्देश होते. पण आता त्यांनी एकाला मारलं तर तुम्ही दोघांना मार द्या असे आदेश आहेत. आपली ताकद आता वाढली आहे. कुणीही आपल्याला त्रास देणार नाही”, असं इश्वरप्पा म्हणाले आहेत. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.

 

“केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्या होत असत”

दरम्यान, केरळमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या हत्या होत असत, असा दावा देखील इश्वरप्पा यांनी बोलताना केला आहे. “बाजूच्या केरळमध्ये जर कुठल्या कार्यकर्त्याने आरएसएसची शाखा उघडली, तर त्याची हत्या केली जात असे. आपल्याकडे प्रत्युत्तर देण्याची ताकद नव्हती. आज भाजपासोबत लाखो लोक आहेत. जेव्हा केव्हा हिंदुत्वासाठी सभा घेतली जाते, लाखो लोक जमा होतात”, असं देखील ते म्हणाले.

 

दरम्यान, यासंदर्भात वाद निर्माण झाल्यानंतर देखील इश्वरप्पा आपल्या विधानावर ठाम आहेत. “मी माझ्या विधानावर ठाम आहे. आपल्या महिलांवर बलात्कार होत असताना आपण शांत बसू शकतो का?”, असा प्रतिप्रश्न इश्वरप्पा यांनी केला आहे.

दरम्यान, एकीकडे इश्वरप्पा आपल्या विधानावर ठाम असताना दुसरीकडे विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेसकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. “मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी तातडीने इश्वरप्पा यांचा राजीनामा घ्यायला हवा. इश्वरप्पा हे आमदार राहण्यासाठीही पात्र नाहीत, मंत्री तर सोडूनच द्या. विधानसभा अध्यक्षांनी त्यांना निलंबित करायला हवं. मुख्यमंत्र्यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करायला हवी. राज्यपालांनी हस्तक्षेप करून शांतता आणि स्थैर्य निर्माण करायला हवं”, अशी मागणी सोशल डेमॉक्रॅटिक पार्टीचे प्रवक्ते अफसर कोडिपेट यांनी केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Karnataka bjp minister k s eshwarappa controversial statement in shimoga pmw