Kamal Haasan Remark on Kannad Language : तामिळ चित्रपटांसह अनेक भाषांच्या चित्रपटांमध्ये काम केलेला सुप्रसिद्ध अभिनेता आणि राजकीय नेते कमल हासन यांनी केलेल्या एका विधानामुळे कर्नाटकमध्ये एक वेगळाच वाद पेटला आहे. चित्रपटासंबंधी एका कार्यक्रमात हासन यांनी कन्नड ही भाषा तामिळमधून तयार झाल्याचे म्हटले आहे. याविरोधात कन्नड भाषिक संघटना आणि राजकीय नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. इतकेच नाही तर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून त्यांनी हासन यांच्याकडे कन्नड भाषेच्या पार्श्वभूमीची जाणीव नसल्याचे म्हटले आहे.

“कन्नडला मोठा इतिहास आहे… त्यांना (कमल हासन) माहिती नाही,” असे सिद्धरामय्या बुधवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले. ते चेन्नई येथे ‘Thug Life’ या चित्रपटाच्या ऑडिओ लाँच कार्यक्रमादरम्यान कमल हासन यांनी कन्नड भाषेबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल बोलत होते.

कमल हासन काय म्हणाले होते?

कन्नड अभिनेता शिवराजकुमार याच्याबरोबर व्यासपीठावर बसलेले हासन म्हणाले की, “अभिनेता शिवराजकुमार म्हणजे दुसर्‍या राज्यात राहणारं माझं कुटुंबच आहे. तुमची भाषा तामिळमधूनच जन्माला आली आहे. त्यामुळे तुम्हीही त्याच गटात समाविष्ट होता”, असं कमल हासन म्हणाला. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे.

कमल हासन यांनी केलेलं हे विधान दोन भाषिक समूहांमधील सांस्कृतिक एकतेसाठी उद्देशून केलं असण्याची शक्यता असली तरी या विधानामुळे कर्नाटकमध्ये एकच वाद पेटला आहे. अनेक कन्नड भाषेचा पुरस्कार करणाऱअया संघटना जसे की कर्नाटक रक्षणा वेदिके (केव्हीआर)ने या विधानाचा निषेध केला आणि बंगळुरू, म्हैसूर, बेळगाव आणि हुब्बळी सारख्य शहरांमध्ये आंदोलन सुरू करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी हासन यांचे पोस्टर्स जाळले, तसेच माफी मागण्याची मागणी करत त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

केव्हीआरचे नेते प्रवीण शेट्टी यांनी हसन यांना कन्नड भाषेला कमी लेखण्यावरून इशारा दिला आहे, तसेच माफी न मागितल्यास त्यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळा आणण्याची धमकी देखील दिली आहे. “तुम्हाला तुमचे चित्रपट येथे दाखवायचे आहेत, पण आमचा आपमान करायचा आहे? हे स्वीकारलं जाणार नाही,” असे ते म्हणाले आहेत.

इतर राजकीय नेत्यांनी देखील या वादात उडी घेतली आहे. कर्नाटक भाजपाचे अध्यक्ष बी वाय विजयेंद्र यांनी हासन यांच्यावर स्वतःच्या मातृभाषेचा मान वाढण्यासाठी कन्नडचा अनादर केल्याचा आरोप केला आहे आणि बिनशर्त माफी मागण्याची मागणी केली आहे. कलाकारांनी सर्व भाषांचा आदर करण्याची संस्कृती स्वीकारली पाहिजे असेही त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हासन यांनी या वादावर अद्याप कोणतीही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान तमिळनाडूतील सत्ताधारी द्रमुकबरोबर युतीमध्ये असलेल्या हासन यांच्या मक्कल निधी मय्यम (एमएनएम) पक्षाला राज्यसभेची जागा मिळाली आहे, यानंतर आता हा वाद पेटला आहे.