गेल्या महिन्यात दोन नेत्यांचं खासगीतील संभाषण जाहीर झाल्याने कर्नाटक काँग्रेस चांगलीच अडचणीत आली होती. हे दोन्ही नेते प्रदेशाध्यक्ष डी शिवकुमार यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबद्दल बोलत होते. दरम्यान त्यानंतर आता पुन्हा एकदा काँग्रेस नेत्यांचं संभाषण जाहीर झालं आहे. डी शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांना आपला माईक सुरु असल्याची कल्पना नसल्याने त्यांचं खासगीतील संभाषण जाहीर झालं आहे. ३१ ऑक्टोबरला माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामध्ये सिद्धरमय्या स्टेजवर सरदार वल्लभभाई पटेल यांचा फोटो नसल्याचं निदर्शनास आणून देतात. देशाचे पहिले उप-पंतप्रधान राहिलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांची त्याच दिवशी जयंती असते. आपण सरदार पटेल यांचा फोटो ठेवत नाही असं सांगण्यात आलं असता सिद्धरमय्या यांनी चिंता व्यक्त करत भाजपा यावरुन टीका करत फायदा घेईल असं सांगतात. यानंतर शिवकुमार तेथील कर्मचाऱ्यांना पटेलांचाही फोटो ठेवण्याची सूचना देतात.

व्हिडीओत काय आहे –

“आज सरदार पटेलांची जयंती आहे, मात्र त्यांचा फोटो नाहीये?,” असं सिद्धरमय्या कन्नड भाषेत कर्नाटकच्या प्रदेशाध्यक्षांना सांगतात. यावर शिवकुमार म्हणतात, “हो…आज त्यांचा वाढदिवस आहे. पण आपण त्यांचा फोटो ठेवत नाही”. यानंतर सिद्धरमय्या इंग्रजीत, भाजपा याचा फायदा घेईल असं सांगतात. यानंतर शिवकुमार तेथील कर्मचाऱ्यांना पटेलांचा फोटो आहे का? असं विचारुन आणायला सांगतात. यानंतर ते सिद्धरमय्या यांना “आपण फोटो ठेवूयात” असं सांगतात, ज्यावर ते “हो ते चांगलं राहील” असं उत्तर देतात.

भाजपाने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून टीका केली आहे.

दरम्यान या व्हिडीओवर सिद्धरमय्या किंवा काँग्रेसने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.