Bengaluru Stampede : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएलची ट्रॉफी जिंकल्यानंतर बंगळुरूमध्ये विजय परेड काढण्यात येत होती. मात्र, या कार्यक्रमावेळी अचानक एम चिन्नास्वामी स्टेडियमजवळ चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत तब्बल ११ जणांचा मृत्यू झाला. तसेच ४७ जण जखमी झाले. या घटनेमुळे कर्नाटकात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, यानंतर कर्नाटक सरकारने कारवाईचे आदेश दिले आणि त्यानंतर पोलिसांनी रायल चॅलेंज बंगळूरु (आरसीबी) आणि कार्यक्रम व्यवस्थापन (इव्हेंट मॅनेजमेंट) कंपनीच्या अधिकाऱ्यांसह ४ जणांना अटक केलं.

तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देखील दिले आहेत. दरम्यान, चेंगराचेंगरीची घटना घडल्यानंतर कर्नाटक सरकारने या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची घोषणा केली होती. मात्र, या मदतीत आता वाढ करण्याची घोषणा कर्नाटक सरकारने केली आहे. त्यामुळे आता या चेंगराचेंगरीच्या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांऐवजी २५ लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

दरम्यान, या संदर्भात कर्नाटकच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. त्यामध्ये म्हटलं की, “चिन्नास्वामी स्टेडियममधील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना जाहीर केलेली मदत २५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचे आदेश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले आहेत. यापूर्वी सरकारने प्रत्येकी १० लाख रुपयांची भरपाई जाहीर केली होती”, असं मुख्यमंत्री कार्यालयाकडून शनिवारी जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे. तसेच रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनेही म्हटलं आहे की कर्नाटक सरकारच्यावतीने पीडितांच्या कुटुंबियांना जाहीर केलेल्या मदतीव्यतिरिक्त जखमी झालेल्यांसाठी एक मदत निधी स्थापन करण्यात येईल.

नेमकं घटना कशी घडली?

आरसीबीच्या विजयी परेडच्यादरम्यान बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. स्टेडियमच्या बाहेर देखील मोठी गर्दी झाली होती. यावेळी गर्दी कमी व्हावी म्हणून पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचं सांगितलं जातं. पण यावेळी चेंगराचेंगरी झाली आणि या घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला. तसेच या घटनेत तब्बल ४७ पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन तपास यंत्रणाकडून होणार चौकशी

कर्नाटक सरकारने शनिवारी निवृत्त न्यायमूर्ती जॉन मायकल कुन्हा यांच्याकडून स्टेडियम दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश जारी केले आहेत. तसेच राज्य सरकारने उपायुक्तस्तरिय अधिकाऱ्याकडून या प्रकरणाची चौकशी करण्याचेही निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे या घटनेची दोन यंत्रणाच्या माध्यमातून चौकशी करण्यात येणार आहे.