Karnataka High Court on Rape Case: हल्ली डेटिंग अ‍ॅप आणि त्यावर मिळणारे जोडीदार यांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. वाहिन्यांवर अनेक डेटिंग अ‍ॅपच्या जाहिरातीही जोरकसपणे चालवल्या जात आहेत. पण अनेकदा या डेटिंग अ‍ॅप्समुळे संबंधितांवर मोठ्या अडचणीत सापडण्याची पाळी येते. असंच काहीसं प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयासमोर सुनावणीसाठी आलं असताना त्यावर न्यायालयाने परखड शब्दांत टिप्पणी करत निकाल दिला. २५ ऑक्टोबर रोजी न्यायालयाने यासंदर्भात सविस्तर निकाल दिला असून त्याचे तपशील आता समोर आले आहेत. त्यानुसार एका डेटिंग अ‍ॅपवर भेटलेले तरुण-तरुणी सरतेशेवटी बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याच्या सुनावणीसाठी थेट न्यायालयापर्यंत येऊन पोहोचले होते!

कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणातील तरुणीने संबंधित तरुणाविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. त्यावरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून खटला चालवला जात होता. आपल्याविरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, याची मागणी करणारी याचिका या तरुणाने न्यायालयात दाखल केली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने तरुणाच्या बाजूने निकाल दिला.

निकालपत्रात काय म्हणाले न्यायमूर्ती?

न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना यांनी यावेळी बलात्कारासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात केलेल्या व्याख्येचा उल्लेख करून हे प्रकरण गुन्हा ठरवण्यासाठी पात्र नसल्याचं नमूद केलं. “तरुण-तरुणीने परस्पर सहमतीने प्रेमसंबंध ठेवल्यानंतर तर काही कारणास्तव एकमेकांशी मतभेद झाल्यास त्या संबंधांना गुन्ह्याचं स्वरूप देता येणार नाही”, असं न्यायालयाने यावेळी म्हटलं. त्याशिवाय, अशा प्रकरणाची सुनावणी घेतल्यास त्यातून अन्यायाच्या दिशेनं जाणारी एक वेगळीच प्रथा रुढ होऊ शकेल, असंही न्यायमूर्ती यावेळी म्हणाले.

नेमकं काय घडलं होतं?

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण-तरुणीची एका डेटिंग अ‍ॅपवर ओळख झाली. तिथे एकमेकांशी संपर्क वाढल्यानंतर हे दोघे काही सोशल मीडिया साईट्सवरदेखील एकमेकांच्या संपर्कात आले. तिथे त्यांचं एकमेकांशी चॅट्सच्या माध्यमातून बरंच बोलणंही झालं. यानंतर त्या दोघांनी एका हॉटेलमध्ये भेटायचं ठरवलं. भेट झाल्यानंतर दोघांमध्ये लैंगिक संबंध प्रस्थापित झाले. पण यानंतर मात्र तरुणीने संबंधित तरुणाच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली. त्यानुसार तरुणाच्या विरोधात कलम ६४ नुसार बलात्काराचा गुन्हादेखील दाखल करण्यात आला.

तपास अधिकाऱ्यांनाही न्यायालयाने सुनावलं

दरम्यान, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही न्यायालयानं फैलावर घेतलं. सोशल मीडियावर त्या तरुण-तरुणींमध्ये झालेल्या चॅट्सवरील संभाषणाकडे पोलिसांनी डोळेझाक केली. त्या चॅट्समधून हे स्पष्ट होत आहे की त्यांच्यात झालेले लैंगिक संबंध हे परस्पर सहमतीने होते. यावेळी न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाकडून बलात्काराची केलेली व्याख्या नमूद केली.

“जर आरोपीने याचिकाकर्तीला शरीरसुखाच्या हेतूने कोणतीही आश्वासनं दिलेली नसतील, तर असे संबंध बलात्कार ठरत नाहीत”, असं सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीत सांगितल्याचं उच्च न्यायालयाने नमूद केलं.

“अशीही काही प्रकरणं असतात जिथे याचिकाकर्त्या महिलेनं आरोपीच्या कोणत्याही आश्वासनाऐवजी त्याच्याबद्दल वाटणारं प्रेम वा आकर्षणामुळे लैंगिक संबंध ठेवण्यास सहमती दिलेली असते. किंवा काही प्रकरणात आपल्या नियंत्रणात नसलेल्या काही अपरिहार्य कारणांमुळे आरोपीला इच्छा असूनही तरुणीशी विवाह करता येत नाही, अशा प्रकरणात बलात्काराच्या आरोपांचा वेगळ्या पद्धतीने विचार केला जायला हवा”, असंही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलं. यानंतर न्यायालयाने आरोपीविरोधातील दाखल गुन्हा रद्द केला.