Karnataka : कर्नाटकमधील एका माजी लिपिकाच्या घरावर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यात कोट्यवधींची संपत्ती आढळून आली आहेत. लोकायुक्ताने केलेल्या या कारवाईत तब्बल २४ घरं, ४ प्लॉट आणि ४ आलिशान गाड्या आणि कोट्यवधींचं सोनं या कारवाईत जप्त करण्यात आलं आहे. एका लिपिकाकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात संपत्ती आढळून आल्यामुळे कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना देखील धक्का बसला आहे.

कर्नाटकातील कोप्पल या ठिकाणी राहणाऱ्या कलाकप्पा निदागुंडी यांच्या घरावर आज लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापा टाकला असता तब्बल एकूण ३० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. हा लिपीक कर्नाटक रूरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट लिमिटेड अर्थात केआरआयडीएलमध्ये काही वर्षांपासून काम करत होता.

लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या मते ही मालमत्ता फक्त या माजी लिपिकाच्या नावावर नाही, तर त्याची पत्नी आणि तिच्या भावाच्या नावावर देखील आहे. या संपूर्ण प्रकरणाची आता चौकशी लोकायुक्ताच्या अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. खरं तर १५,००० रुपये महिना पगार असलेल्या क्लर्ककडे एवढी मोठी संपत्ती आली कशी? असा सवाल आता अनेकांनी उपस्थित केला आहे, १५ हजार रुपये पगार असणाऱ्या व्यक्तीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात संपत्ती आढळल्यामुळे अनेकांना धक्काही बसला आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

कलाकप्पा निदागुंडी आणि केआरआयडीएलमधील आणखी एक माजी अभियंता यांच्यावर वेगवेगळ्या ९६ प्रकल्पांसाठी बनावट कागदपत्रे तयार करून आणि बनावट बिले तयार करून ७२ कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. लोकायुक्त अधिकाऱ्यांकडे करण्यात आलेल्या या प्रकरणाच्या तक्रारीनंतर छापे टाकले असता माजी लिपिकाकडे कोट्यवधींचं घबाड आढळून आलं आहे.

दरम्यान, कोप्पलचे आमदार के. राघवेंद्र हितनल यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की, “सरकार या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत असून योग्य कारवाई करण्यासाठी आणखी व्यापक चौकशी केली जाईल.” दरम्यान, लोकायुक्त अधिकाऱ्यांनी निदागुंडी यांच्या निवासस्थानी छापा टाकल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं असून या प्रकरणामुळे कर्नाटकच्या प्रशासनात देखील खळबळ उडाली आहे.