देशात करोनाचं सावट असल्याने फैलाव रोखण्यासाठी अनेक राज्यांनी लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे. लॉकडाउनमुळे गेल्या काही दिवसात करोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. लोकांची गर्दी आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जावे यासाठी लॉकडाउनसारखे कठोर निर्णय घेतले जात आहेत. मात्र अनेक ठिकाणी लॉकडाउनचे नियम पायदळी तुडवले जात असल्याचं चित्र आहे. कर्नाटकच्या बेळगावातील मराडीमठ भागात एका घोड्याच्या अंत्यसंस्काराला शेकडोंची गर्दी जमल्याचं पाहायला मिळलं. विशेष म्हणजे कर्नाटकात करोनाचा फैलाव रोखण्यासाठी ७ जूनपर्यंत लॉकडाउनचा अवधी वाढवण्यात आला आहे. असं असताना गर्दी जमल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

स्थानिक देवाला समर्पित केलेला हा घोडा होता. त्यामुळे तेथील स्थानिक लोकांची या घोड्याप्रती आस्था होती. मराडीमठ गावात शुक्रवारी रात्री या घोड्याचा मृत्यू झाला. त्यानंतर शनिवारी या घोड्याची अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेला शेकडोंची गर्दी जमा झाली होती. यावेळी करोनाचं संकटही लोकं विसरून गेले होते. अंत्ययात्रेत पुरुष, महिला आणि लहान मुलांचाही सहभाग होता. यावेळी अनेकांनी मास्कही घातला नव्हता. धार्मिक पद्धतीने घोड्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओनंतर स्थानिक प्रशासनाने मराडीमठ भागातील ४०० घरांवर निर्बंध लादले आहेत. या भागातील लोकांना बाहेर येण्याजाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच त्यांची करोना चाचणीही केली जात असल्याची माहिती तहसीलदार प्रकाश होलेप्पागोल यांनी दिली आहे.

दुसऱ्या महायुद्धातला जिवंत बॉम्ब eBay वर विकण्याचा प्रयत्न, पोलिसांनी केली अटक

घोड्याच्या अंत्यसंस्काराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी स्थानिक प्रशासन आणि पोलिसांवर टीकेची झोड उठवली आहे. देशात इतकी गंभीर स्थिती असताना पोलिसांना ही बाब लक्षात कशी आली नाही असा प्रश्नही उपस्थित केला आहे.