पीटीआय, बंगळूरु : Karnataka Vidhan Sabha Election Results 2023 कर्नाटक विधानसभेच्या २२४ मतदारसंघांसाठी १० मे रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज, शनिवारी होणार आहे. मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष काँग्रेसच्या बाजूचे असले तरी ते खरे ठरतात की मतदार दुसऱ्यांदा भाजपलाच संधी देऊन सलग एकाच पक्षाकडे सत्ता न देण्याची राज्यातली ३८ वर्षे जुनी परंपरा खंडीत करतात, याबद्दल उत्सुकता आहे.

या वेळी राज्यात विक्रमी ७३.१९ टक्के मतदान झाले. नवमतदारांबरोबरच ज्येष्ठ मतदारांनीही उत्साहाने मतदान केले होते. सकाळी ८ वाजता राज्यभरात ३६ केंद्रांवर मतमोजणी सुरू होईल. मतमोजणीसाठी सर्व केंद्रांवर पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. साधारणत: दुपापर्यंत मतदारांनी कोणाला कौल दिला आहे त्याचे चित्र स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे. मुख्यत: सत्ताधारी भाजप, मुख्य विरोधी पक्ष काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) यांच्यामध्ये लढत झाली. मात्र चुरस भाजप आणि काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांमध्येच होती. राष्ट्रवादी काँग्रेस, दिल्ली आणि पंजाबमधील सत्ताधारी आम आदमी पक्षानेही या निवडणुकीत उमेदवार उभे केले होते. त्याशिवाय महाराष्ट्राचे लक्ष सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कामगिरीकडे असेल.

 भ्रष्टाचाराच्या आरोपांनी त्रस्त झालेल्या भाजपची प्रचारात सर्व मदार मुख्यत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर होती. कर्नाटकात गेल्या ३८ वर्षांपासून कोणत्याही सरकारला सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवता आलेली नाही. मात्र, मोदींच्या लोकप्रियतेच्या आधारे हा इतिहास पुसण्याची भाजपची इच्छा आहे. तर सतत पराभव सहन करणाऱ्या काँग्रेसच्या दृष्टीने राष्ट्रीय पातळीवर चैतन्य निर्माण करण्यासाठी कर्नाटकातील विजय अतिशय महत्त्वाचा आहे. यंदा काँग्रेसचे नेतृत्व कन्नड भूमिपुत्राच्या हाती असल्याचा पक्षाला फायदा होईल, अशी आशा काँग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे.

भाजप आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रचारासाठी भरपूर मेहनत घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी झंझावाती प्रचार केला, तर काँग्रेसच्या प्रचाराची धुरा राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी सांभाळली. गेल्या वर्षी राहुल गांधींच्या नेतृत्वात निघालेल्या ‘भारत जोडो’ यात्रेला कर्नाटकात चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्याचाही फायदा होण्याची पक्षनेतृत्वाला आशा आहे. मतदानोत्तर चाचण्यांनी सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. काँग्रेसबरोबरच भाजपनेही विजयाचा दावा केला आहे. जेडीएसला मात्र त्रिशंकू विधानसभेची अपेक्षा आहे, तसे झाल्यास पक्षाला सरकार स्थापनेमध्ये भूमिका बजावता येईल आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांना किंगमेकर होता येईल, अशी अपेक्षा पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना वाटत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपला विजयाबद्दल विश्वास मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि भाजपच्या नेत्यांची माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या वेळी पक्षाला बहुमत मिळण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. इतर पक्षांबरोबर आघाडी सरकार स्थापन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले. आम्हाला जादूई आकडा गाठता येईल, असा विश्वास आहे, असा दावा त्यांनी केला. १४१ जागा जिंकण्याचा काँग्रेसचा दावा काँग्रेस किमान १४१ जागांवर विजय मिळवेल, असा दावा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केला. मतदानोत्तर चाचण्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा आम्हाला जास्त जागा मिळतील आणि काँग्रेस बहुमत मिळवून सरकार स्थापन करेल, असे ते म्हणाले. राज्यात काँग्रेसची लाट आहे, असा दावा करताना, राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होण्याची किंवा पुन्हा ‘रिसॉर्टचे राजकारण’ रंगण्याची शक्यताही त्यांनी फेटाळली.