पाकिस्तान लष्करप्रमुखांची गळाभेट म्हणजे राफेल करार नाही: सिद्धू

‘पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट अखेर कामी आली. निदान ही गळाभेट राफेल करार नव्हती, असा टोला त्यांनी भाजपाला लगावला आहे.

ऑगस्टमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान नवज्योतसिंग सिद्धू यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट घेतली होती.

पाकिस्तानने गुरू नानक यांच्या ५५० जयंतीनिमित्त कर्तारपूर मार्गिका खुली करत असल्याचे जाहीर केल्यानंतर पंजाबमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट शेवटी कामी आली. १५- १६ कोटी लोकांसाठी ही गळाभेट अमृतासारखीच ठरली. किमान माझी गळाभेट ही राफेल करार नाही हे स्पष्ट झाले, असे सांगत सिद्धू यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

गुरुवारी पाकिस्तानने गुरू नानक यांच्या ५५० जयंतीनिमित्त कर्तारपूर मार्गिका खुली करत असल्याची घोषणा केली होती. भारतीय यात्रेकरूंच्या सोयीसाठी कर्तारपूर मार्गिका बांधावी, अशी विनंती भारताने पाकिस्तानला केल्यानंतर काही वेळातच पाकने ही माहिती दिली होती. ऑगस्टमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान नवज्योतसिंग सिद्धू यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट घेतली होती. भाजपाने यावरुन सिद्धूंवर टीकास्त्र सोडले होते. इतकेच नव्हे तर पंजाबमधील मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी देखील सिद्धूंच्या या कृतीवर नाराजी व्यक्त केली होती.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सिद्धू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट अखेर कामी आली. निदान ही गळाभेट राफेल करार नव्हती, असा टोला त्यांनी भाजपाला लगावला आहे. ‘२०१४ मधील मोदी लहर सर्वसामान्यांसाठी ‘जहर’ (विष) झाली. मोदी हे फक्त उद्योजकांच्या हातातील बोलके बाहुले आहेत, अशी बोचरी टीका त्यांनी केली. २०१९ मध्ये मोदी लहर संपुष्टात येईल आणि राहुल गांधीच पंतप्रधान होतील, असा दावाही त्यांनी केला.

सिद्धूंचा गळाभेटीबाबत काय दावा होता?
कर्तारपूर साहिब हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील नरोवाल येथे आहे. कर्तारपूर साहिब आंतरराष्ट्रीय सीमेजवळ आहे. रावी नदीच्या तीरावरील या गुरुद्वारात जाण्यासाठी भारतातील शीख भाविक इच्छुक असतात. ऑगस्टमध्ये पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची भेट घेतल्यानंतर सिद्धू यांनी कर्तारपूर साहिबसंदर्भात पाकच्या लष्करप्रमुखांची भेट घेतल्याचा दावा केला होता. ‘दोन्ही पंजाबदरम्यानची कर्तारपूर येथील सीमा पाकिस्तानकडून खुली करण्याचे आश्वासन जनरल बाजवा यांनी दिले. गुरू नानक यांच्या ५५०व्या जयंतीनिमित्त पाकिस्तानात कर्तारपूर येथील दरबारा साहिब गुरुद्वारात शीख भाविकांना त्यामुळे जाता येऊ शकेल’ असे त्यांनी म्हटले होते. गुरुवारी पाकिस्तानने कर्तारपूर मार्गिका खुली केल्याचे जाहीर केल्याने सिद्धू यांच्या दाव्याला महत्त्वप्राप्त झाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kartarpur corridor pakistan army chief hug works its better than rafale punjab minister navjot singh sidhu

ताज्या बातम्या