तामिळनाडूच्या करुर जिल्ह्यात अभिनेता विजयच्या रॅलीत शनिवारी चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत आत्तापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला. १०० हून अधिक लोक या चेंगराचेंगरीत जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. विजयच्या रॅलीत सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. नेमकं काय घडलं की चेंगराचेंगरी सुरु झाली? याचं कारण आता समोर आलं आहे.

चेंगराचेंगरी का झाली?

चेंगराचेंगरी का झाली त्याची विविध कारणं समोर येत आहेत. पोलीस या सगळ्या प्रकाराची चौकशी करत आहेत. सध्या विशिष्ट एका कारणामुळे चेंगराचेंगरी झाली याच्या निष्कर्षापर्यंत पोहचणं कठीण होईल असं पोलिसांनी म्हटलं आहे. दरम्यान लोक एकदम जोशात होते, विजयचं म्हणणं ऐकण्यासाठी गर्दीचे कान एकवटले होते. अचानक काहीतरी घडलं आणि जोशात सुरु असलेली रॅली अचानक चेंगराचेंगरी सुरु झाली. त्यानंतर जोशाचं रुपांतर वेदना, किंकाळ्यांमध्ये झालं. गर्दीला नियंत्रित करण्यात पोलीस अयशस्वी ठरले त्यामुळे एकच हलकल्लोळ माजला.

प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?

एका प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार विजयने एक गाणं म्हटलं. त्यात बालाजी १० रुपयांचा मंत्री असा उल्लेख होता. काही लोक सांगत आहेत अचानक लाठी चार्ज सुरु झाला. तर दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं विजय बोलत होता तेव्हा अचानाक जनरेटरच्या फ्लडलाइट्स बंद झाल्या. एक महिला तिच्या मुलीला शोधू लागली आणि अचानक चेंगराचेंगरी झाली. गर्दीमध्ये अस्वस्थता वाढली आणि चेंगराचेंगरी सुरु झाली असंही काहींनी सांगितलं. प्रत्येक प्रत्यक्षदर्शी वेगवेगळी माहिती सांगत आहेत. त्यामुळे एका निष्कर्षापर्यंत पोहचणं पोलिसांनाही कठीण जातं आहे. तपास समितीचा अहवाल आल्यानंतरच सत्य समोर येईल. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

चेंगराचेंगरीशी निगडीत पाच महत्त्वाच्या घडामोडी

१) रॅलीमध्ये चेंगराचेंगरी कशी सुरु झाली? याचं ठोस कारण अद्याप समोर आलेलं नाही.

२) प्रत्यक्षदर्शी वेगवेगळी माहिती देत आहेत. विजय हात जोडून रॅलीत आलेल्या लोकांना आवाहन करत होता. पण तोपर्यंत परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती.

३) पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र गर्दीपुढे पोलिसांना फार काही करता आलं नाही. विजयने अर्ध्यातच त्याचं भाषण थांबवलं.

४) काही प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार विजयने भाषण सुरु केल्यानंतर काही वेळाने चेंगराचेंगरी सुरु झाली.

५) राज्य सरकारने या प्रकरणात निवृत्त न्यायाधीश जस्टिस अरुणा जगथेशन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल समोर आल्यानंतरच सत्य समोर येणार आहे.

प्रशासनावर प्रश्नचिन्हं

चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर आता प्रशासनावर प्रश्नचिन्हं उपस्थित होत आहेत. विजयला रोड शो करण्यासाठी आधी संमती मिळाली नव्हती. अशात आता प्रश्न असा उपस्थित होतो आहे की बंदी घालण्यात आली होती तरीही विजयला रॅलीसाठी संमती कशी काय मिळाली? प्रशासनाने आता असं म्हटलं आहे की जितक्या लोकांना जमण्यासाठी संमती देण्यात आली होती त्यापेक्षा जास्त संख्येने लोक जमा झाले होते. मात्र संमती दिली कुणी हा प्रश्न कायम आहे.